स्व. वेणुताई चव्हाण रुग्णालयाला सलग तीन वर्षे आनंदीबाई जोशी पुरस्कार

marathi news karhad hospital three years aanandibai joshi award
marathi news karhad hospital three years aanandibai joshi award

कऱ्हाड -  येथील स्व. सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाने सलग तीन वर्षे आनंदीबाई जोशी पुरस्कार पटकावुन विक्रम केला आहे. रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोयी - सुविधांसह उपचार आणि अन्य बाबींचा विचार करुन हा पुरस्कार सलग तीनवेळा पटकावणारे येथील उपजिल्हा रुग्णालय हे राज्यातील पहिले उपजिल्हा रुग्णालय ठरले आहे. त्यातून कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालय हे रुग्णसेवेचे मॉडेल म्हणुन नावारुपास आले असून त्यातून रुग्णालयाच्या शिरपेचात मानाचा तुराच रोवला गेला आहे. 

रुग्णांच्या सेवेसाठी येथे पहिल्यांदा शासकीय सेवा म्हणुन कॉटेज हॉस्पीटल सुरु झाले. त्याव्दारे रुग्णांना शासकीय आरोग्य सेवा मिळू लागली. त्यानंतर विस्तारवाढ झाल्याने कॉटेज हॉस्पीटलला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला. त्याचे वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय असे नामकरण करण्यात आले. त्याव्दारे कऱ्हाड, पाटण, वाळवा, कडेगाव आदी तालुक्यातील रुग्णांना संबंधित रुग्णालयामार्फत सेवा दिली जाते. मध्यंतरी आमदार पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्रीपदी असताना रुग्णालयाला मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याने रुग्णालयात आवश्यक त्या सोयी - सुविधा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांची चांगली सोय झाली आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वर्षात 1 लाख 18 हजार 69 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. तर 3 हजार 559 महिलांची प्रसुती उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आल्या आहेत.

दिवसेंदिवस दररोज उपचार व तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. माता व बालमृत्युचे प्रमाण कमी करणे, प्रजनन व बाल आरोग्याची सेवा प्रभावीपणे देणे, कुटुंब कल्याण उपक्रमांची यशस्वीपणे अमंलबजावणी करणे आणि लोकसहभागातून आरोग्य कार्यक्रम यशस्वी करणे या निकषांवर राज्याच्या आरोग्य विभागामार्फत येथील उपजिल्हा रुग्णालयाचे मुल्यांकन झाले. त्यामध्ये तीन वर्षापुर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयाला आनंदीबाई जोशी पुरस्कार जाहीर केला. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रकाश शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा पुरस्कार स्विकारला होता. केवळ पुरस्कारापुरतेच काम न करता पुरस्कारासाठी आलेल्या पथकाच्या माहितीसाठीच आरोग्य सेवा न राहता रुग्णांना कायमस्वरुपी सेवा मिळावी यासाठी डॉ. शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सातत्याने प्रयत्न केला. काही विभागांचे तज्ञ डाॅक्टर नसताना आणि कर्मचारी संख्या कमी असुनही उपजिल्हा रुग्णालयाने आहे त्या मनुष्यबळात रुग्णांना चांगली सेवा आणि सुविधा देवुन शासनाचा आरोग्य विभागाच्या योजना सामान्यांपर्यंत पोचवण्याचे मोठे काम केले आहे. त्याचबरोबर रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याचेही प्रमाण वाढल्याचेही रुग्णालयातुन सांगण्यात आले.    

वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाने सलग तीनवेळा आनंदीबाई जोशी पुरस्कार पटकावुन हॅट्रीक केली आहे. चांगल्या टीमवर्कची ती पोचपावती असुन त्यामध्ये रुग्णालयातील सर्वांचाच वाटा आहे. यापुढेही रुग्णालयाचा दर्जा टिकवुन चांगल्या सोयी-सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रकाश शिंदे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com