नगर - राज्यस्तरीय संत तुकाराम वनग्राम स्पर्धेत खांडगेदरा गाव राज्यात द्वितीय

Khandagedara
Khandagedara

आश्वी (नगर) : राज्य शासनाच्या वनविभागामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय संत तुकाराम वनग्राम स्पर्धेत संगमनेर तालुक्यातील खांडगेदरा गावाच्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीने जिल्ह्यात प्रथम तर राज्यात द्वितीय येण्याचा बहुमान पटकावला आहे.

राष्ट्रीय वननीती १९८८ नुसार वनसंरक्षण आणि वनविकासात स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग होण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ग्रामस्थांच्या सहभागातून वनव्यवस्थापन राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार वनक्षेत्र व सीमेवर असलेल्या १५६०० गावांपेकी आजपर्यंत १२६६१ गावांमध्ये संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे.

वनांचे रक्षण करणे, अवैध वृक्षतोड, वनक्षेत्रातील अतिक्रमण, वनवणवा, अवैध चराई यांना समित्यांच्या माध्यमातून प्रतिबंध करणे अपेक्षित आहे. तसेच त्यांच्या कार्यक्षेत्रातील वनांचे व्यवस्थापन, व जनजागृती करण्याचे काम या समितीच्या अखत्यारित असते.

या कामात सतत सुधारणा होण्याच्या दृष्टीकोनातून व निर्माण झालेल्या चुरशीतून अधिकाधिक चांगले काम होण्यासाठी २००६ साली शासनाने या समित्यांमध्ये जिल्हा व राज्यस्तरिय स्पर्धा घेऊन संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत पारितोषिके देण्याचा निर्णय घेतला. राज्याच्या वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या निवड समितीच्या परीक्षण अहवालानुसार सन २०१६ - १७ करिता नाशिक वनवृत्तातील संगमनेर तालुक्यातील खांडगेदरा गावाच्या समितीने ९९ टक्के गुण मिळवून राज्य पातळीवर दुसरा क्रमांक मिळवला.

तीन वर्षांपूर्वी जिल्हास्तरिय द्वितीय क्रमांकावर असलेल्या या गावाने सातत्याने घेतलेल्या परिश्रमामुळे त्यांना दोन्ही स्पर्धेत यश मिळवता आले. येत्या २१ मार्चच्या जागतिक वनदिनानिमित्त मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात हे पारितोषिक देण्यात येणार आहे. संगमनेरचे उपविभागिय वनाधिकारी मच्छिंद्र गायकर व वनपरिक्षेत्राधिकारी नीलेश आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली खांडगेदरा संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष रविंद्र खांडगे, सचिव बापू काळे, वनरक्षक श्रीमती एम. आर. दिघे, वनकर्मचारी सुखदेव गाडेकर व ग्रामस्थांनी यासाठी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com