गणेशमूर्ती विनामूल्य घरी पोचविणार : रिक्षाचालकांचा उपक्रम

दिनकर पाटील
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

'व्यवसाय तर रोजच करतो, एक दिवस सेवेसाठी'

"रिक्षाचालकांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत गणेशमूर्ती विनामूल्य घरी पोचविण्याची सेवा उपलब्ध करून दिल्याने भक्‍तांची सोय होणार आहे. वेगळा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी त्यांनी जोपासली आहे.''
- श्रीनिवास कांबळे, नेसरी

नेसरी : येथील रिक्षाचालकांनी गणेश चतुर्थीनिमित्त नेसरी पंचक्रोशीतील तारेवाडी, तळेवाडी, डोणेवाडी, सावंतवाडी तर्फ नेसरी येथे गणेशमूर्ती विनामूल्य घरी पोचविण्याची सेवा उपलब्ध केली आहे. नेसरी बसस्थानक परिसरात डिजिटल फलकाद्वारे या उपक्रमाबाबत "व्यवसाय तर रोजच करतो, एक दिवस सेवेसाठी' असा संदेश दिला आहे.

सामाजिक भावना कमी होत असतानाच नेसरीतील रिक्षाचालकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत गणेशमूर्ती विनामूल्य घरी पोचविण्याची सेवा उपलब्ध करून देऊन वेगळा उपक्रम जोपासला आहे. तरुण रिक्षाचालकांनी एकत्र येऊन विनामूल्य सेवा देण्यासाठी विचारविनिमय केला. त्याला एकमुखी पाठिंबा मिळाला. फलकाद्वारे माहिती ग्रामस्थांना मिळताच सर्वत्र या उपक्रमाचे कौतुक होत आहे. सेवा देणाऱ्यांनी फलकाद्वारे आपला मोबाईल क्रमांक प्रसिद्ध करून संपर्क साधण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले आहे. जोतिबा पाटील, रामदास शिखरे, फैयाज जकाते, संतोष गुरव, अमोल मांगले, सचिन पाटील, अजित पाटील आदी रिक्षाचालकांनी ही सेवा सुरू केली आहे.

ग्रामीण भागात घरोघरी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. दोन-तीन महिने आधीपासून नागरिक गणेशमूर्ती ठरविणे, आकर्षक सजावट करणे आदी कारणांसाठी आर्थिक तरतूद करतात. नेसरी पंचक्रोशीत हेळेवाडी, नेसरी, तारेवाडी, अडकूर आदी ठिकाणांहून गणेशमूर्ती आणल्या जातात. रिक्षाचालकांनी गणेशमूर्ती विनामूल्य घरी पोचविण्याची सेवा दिल्याने भाविकांना याचा लाभ होणार आहे. दरवर्षी उपक्रम राबविण्याचा रिक्षाचालकांचा मानस आहे.

टॅग्स