अतिक्रमण काढण्याचे मनपासमोर आव्हान 

विकास कांबळे
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर : 'गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर आता त्याची अंमलबजावणी लांबवू नये,' अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे. त्याचप्रमाणे या आराखड्याची अंमलबजावणी करत असताना काही ठिकाणचे अतिक्रमण काढण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्याचप्रमाणे कामाच्या दर्जाच्या नावाखाली काम बंद पाडण्याची भाषा कुणी करू नये, असेही मत व्यक्‍त होत आहे. 

कोल्हापूर : 'गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर आता त्याची अंमलबजावणी लांबवू नये,' अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे. त्याचप्रमाणे या आराखड्याची अंमलबजावणी करत असताना काही ठिकाणचे अतिक्रमण काढण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्याचप्रमाणे कामाच्या दर्जाच्या नावाखाली काम बंद पाडण्याची भाषा कुणी करू नये, असेही मत व्यक्‍त होत आहे. 

अंबाबाईच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत आहे. त्यांना सुविधा पुरविण्यासाठी महापालिका आणि पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती असमर्थ ठरू लागली. पर्यटकांना चांगले वाहनतळ नाही, भक्‍त निवासस्थान नाही, दर्शनासाठी मंडप नाही, अन्य कोणतीही सुविधा नाही. या सुविधा भाविकांना उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्‍यकता होती. हा निधी शासनाकडून मिळावा यासाठी प्रयत्न सुरू झाला. राज्यात कॉंग्रेस आघाडीचे सरकार असताना साधारणपणे दहा वर्षांपूर्वी श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकासाचा अडीचशे कोटींचा आराखडा तयार करण्यात आला. तेव्हापासून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यात बदल होत, होत हा आराखडा 80 कोटींवर आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामुळे अखेर हा आराखडा मंजूर झाला. 

आराखड्यामध्ये दोन ठिकाणी वाहनतळ आणि एका ठिकाणी वाहनतळ व भक्‍तनिवास बांधण्यात येणार आहे. व्हिनस कॉर्नर येथे वाहनतळ व भक्‍त निवास बांधण्यात येणार आहे. सध्या या ठिकाणी वाहन तोडणाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण काढण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. बिंदू चौक येथे सध्या पर्यटकांसाठी वाहनतळ केले आहे. या ठिकाणी दुमजली वाहनतळ उभारण्यात येणार आहे. 

सरस्वती चित्रमंदिरासमोरील जागेवर दुसरे वाहनतळ उभारण्यात येणार आहे. या दोन्ही ठिकाणांहून भाविकांना केवळ पाच मिनिटांत चालत मंदिरात जाता येणार आहे. 

व्हिनस कार्नर भक्‍त निवास व वाहनतळ 
व्हिनस कॉर्नर येथील गाडीअड्ड्यावर 8 हजार 500 चौरस मीटर भूखंडावर वाहनतळ व भक्‍त निवास उभारण्यात येणार आहे. भक्‍त निवास इमारतीसाठी 21. 48 कोटी रुपये; तर वाहनतळासाठी 11 कोटी खर्च अपेक्षित आहे. भक्‍त निवासामध्ये 138 खोल्या, 10 सुट आणि 18 डॉर्मिटरी असणार आहे. पार्किंगमध्ये 240 चारचाकी व तेवढ्याच दुचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय असणार आहे. याशिवाय डायनिंग हॉल, समुदाय हॉल, शॉपचीही सुविधा असेल 

बिंदू चौक वाहनतळ 
बिंदू चौकातील 4 हजार 841 चौरस मीटरच्या जागेवर वाहनतळ उभारण्यात येणार आहे. यासाठी 4 कोटी 89 लाख खर्च अपेक्षित आहे. या ठिकाणी 170 चारचाकी व 315 दुचाकी पार्किंगची व्यवस्था असणार आहे. याशिवाय स्वच्छतागृह, डॉर्मिटरी, लॉकर्सची सुविधाही उपलब्ध असणार आहे. 

सरस्वती चित्रमंदिर वाहनतळ 
येथील 2200 चौरस मीटर जागेवर वाहनतळ उभारण्यात येणार आहे. यासाठी 7 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या ठिकाणी 140 चारचाकी व 145 दुचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था होणार आहे. याशिवाय स्वच्छतागृह, डॉर्मिटरी व लॉकर्सची सुविधा असणार आहे.

Web Title: marathi news kolhapur news Mahalakshmi Temple development plan