तलाव पुनर्भरणाचा प्रस्ताव तयार करा : चंद्रकांत पाटील

तलाव पुनर्भरणाचा प्रस्ताव तयार करा : चंद्रकांत पाटील

गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्‍यात कमी पाऊसमानामुळे एकाही लघुपाटबंधारे तलावात समाधानकारक पाणीसाठा झालेला नाही. यामुळे आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी तलाव पुनर्भरणाला निधी उपलब्ध होण्यासाठी महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन पत्र दिले. त्यावर मंत्री श्री. पाटील यांनी पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता व जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ प्रस्ताव तयार करून देण्याच्या सूचना दिल्या. 

तलाव जलपुनर्भरणासंदर्भात आमदार कुपेकर यांनी मुंबईत श्री. पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. गडहिंग्लज तालुक्‍यातील सात व चंदगडमधील एका तलावात 50 टक्केपेक्षा कमी साठा आहे. यामुळे शेतीसाठी व पिण्यासाठी पाणीटंचाई भासणार आहे. गेल्या आठवड्यात सर्वच तलावांना भेटी देऊन पाहणी केली. कर्नाटक शासनाने हिरण्यकेशी नदीवर 200 ते 250 अश्‍वशक्तीचे पंप बसवून वाहत्या पाण्याचा उपसा करून दहा किलोमीटर परिसरातील तलाव भरून घेण्याची योजना यंदापासून राबविली आहे. याच धर्तीवर गडहिंग्लजमधील तलाव भरून घेणे शक्‍य आहे. 

हिरण्यकेशी नदीतील वाहत्या पाण्याचा उपसा करून तालुक्‍यातील सर्वच तलाव भरून घेण्यासाठी शाश्‍वत योजना आवश्‍यक आहे. या शिवाय, तलावाची पाहणी करताना शेतकऱ्यांनी तलावाशेजारील नाले तलावाकडे वळवण्याचा उपाय सुचवला आहे. या साठी नाल्यांची खोदाई करणे, आवश्‍यक त्या ठिकाणी सिमेंटचे पाईप्स टाकणे व ओढ्यात बंधारे घालून पाणी वळवावे लागणार आहे. ही कामे जलयुक्त शिवार योजनेंतर्गतही करता येतील. अशा शाश्‍वत उपाययोजना केल्यास भविष्यात कधीच पाणीटंचाई जाणवणार नाही. यामुळे राज्य शासनाने यावर गांभीर्याने विचार करण्याची मागणी आमदार कुपेकरांनी केली. त्यावर मंत्री पाटील यांनी तलाव जलपुनर्भरणासाठी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता तर जलयुक्त शिवारमधून ओढे जोड प्रकल्पासाठी जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ सर्व्हे करून अहवाल देण्याची सूचना केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com