बेळगाव महापालिकेत आयुक्त-नगरसेवकांमध्ये खडाजंगी

मल्लिकार्जुन मुगळी
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

बेळगाव :  सर्वसाधारण बैठकीत नगरसेवकांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याची गरज नाही, असे उर्मट उत्तर महापालिका आयुक्त शशीधर कुरेर यांनी दिल्यामुळे गुरूवारी वाद झाला. 'बांधकाम परवान्यासाठी प्रत्येक टेबलवर 'नैवेद्य' द्यावा लागतो', असा थेट आरोप सरला हेरेकर यांनी केल्यामुळे खळबळ उडाली.

बेळगाव :  सर्वसाधारण बैठकीत नगरसेवकांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याची गरज नाही, असे उर्मट उत्तर महापालिका आयुक्त शशीधर कुरेर यांनी दिल्यामुळे गुरूवारी वाद झाला. 'बांधकाम परवान्यासाठी प्रत्येक टेबलवर 'नैवेद्य' द्यावा लागतो', असा थेट आरोप सरला हेरेकर यांनी केल्यामुळे खळबळ उडाली.

सराफ गल्लीतील अनधिकृत बांधकामावर बैठकीत जोरदार चर्चा झाली. बैठकीत नगरसेवक दिनेश नाशीपुडी यांनी माहिती माळमारूती वसाहतीच्या विकास शुल्क वसुलीचा विषय उपस्थित केला. त्या संदर्भातील आदेशाची प्रत देण्याची मागणी केली. या मागणीवर आयुक्तांनी दिलेले स्पष्टीकरण नाशीपुडी यांना रूचले नाही व आयुक्तांकडे आदेशाची प्रत मागितली. पण आयुक्तांनी 'माझ्याशी नव्हे, महापौरांशी बोला' असे सांगितले. त्यावर नाशीपुडी संतापले, आयुक्त्त उत्तर  देणार नसतील तर आम्ही चहा बिस्किटासाठी यायचे का? असा सवाल त्यांनी केला.

माळमारूती येथील भूखंडांवर इमारत बांधण्यासाठी परवाना देताना विकास शुल्क आकारले जाते. त्यासंदर्भात नाशिपुडी यांना स्पष्टीकरण हवे होते. पण आयुक्तांनी स्पष्टीकरण न देता नाशिपुडी यांच्याशी हुज्जत घातली. आयुक्तांच्या या वागण्याला नगरसेवकानी आक्षेप घेतला व त्यावरून वाद वाढला; पण शहर अभियंते नाईक यांनी स्पष्टीकरण दिले व विकास शुल्काबाबतच्या आदेशाची प्रत दिली जाईल, असे सांगितले. त्यानंतर हा वाद संपला.

बांधकाम नियमांबाबत बंगळूर येथे झालेली बैठक व 1976 च्या आधी एनए झालेल्या जागेसाठी लेआऊटची सक्ती न करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचा मुद्दा विनायक गुंजटकर यांनी उपस्थित केला. या विषयावर संजय सवाशेरी व जमखंडी यानी आयुक्तांची झाडाझडती घेतली. बांधकाम परवान्यासाठी नगरसेवकानी पाठपुरावा करू नये असे वक्तव्य आयुक्तांनी केला. त्याला सवाशेरी व गुंजटकर यांनी आक्षेप घेतला. परवाने लवकर मिळत नाहीत, असा थेट आरोपही गुंजटकर यांनी केला. प्रत्येक टेबलकर नैवेद्य ठेवल्याशिवाय कामे होत नाहीत, असा थेट आरोप लेखा स्थायी समिती अध्यक्ष सरला हेरेकर यांनी केला. 'पैसे घ्यायचे बंद करा', अशी मागणी त्यांनी केली. सात दिवसात परवाने द्यायची व्यवस्था करा अशी मागणीही केली.

आरोग्य स्थायी समिती अध्यक्ष राजू बिर्जे यानी बळ्ळारी नाल्यात महेंद्र धोंगडी यानी केलेल्या अतिक्रमणाचा विषय उपस्थित केला. त्या अतिक्रमणांवर कारवाईची मागणी केली. या विषयावर माजी महापौर किरण सायनाक व सत्ताधारी गटनेते पंढरी परब यांनीही आक्रमक भूमिका घेतली. नाल्यांच्या बफर झोनमधील व नाल्यांमधील अतिक्रमण हटविण्याची आग्रही मागणी केली. सायनाक यानी हनुमानगर येथील नाल्यावरील इमारतींचा विषय उपस्थित केला. तेथील नाचले गायब कसे झाले? असा सवाल त्यानी केला. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता नाल्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई करा अशी मागणी त्यानी केली. महापालिका बरखास्त झाली तरी चालेल पण कारवाई झालीच पाहीजे अशी मागणीही त्यांनी केली.