माय इको फ्रेंडली गणेशा..! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

कोल्हापूर : पर्यावरणाच्या रक्षणासाठी तरुणाईचे हात शाडूच्या गणेशमूर्ती तयार करण्यासाठी आज सरसावले. 115 विद्यार्थ्यांनी 70 किलो शाडूतून दहा प्रकारच्या मूर्ती तयार करीत आपल्या कौशल्याची चुणूक दाखविली. विशेष म्हणजे या मूर्तींमध्ये बिया रुजविल्या असून, मूर्तींचे विसर्जन कुंडीत केले जाणार आहे. शिवाजी विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र अधिविभागातर्फे आयोजित 'ट्री गणेशा' कार्यशाळेत गणेशमूर्तींनी आकार घेतला आणि पर्यावरण रक्षणासाठी सज्ज असल्याचा दाखला दिला. 

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती नदी, तलाव, ओढ्यात विसर्जित केल्या जातात. त्यातून होणाऱ्या प्रदूषणातून जलचरांना धोका पोचतो. दरवर्षी गणेश विसर्जनावेळी शहरातील नदी व तलावांवर पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांच्या नेतृत्त्वाखाली विद्यार्थी-विद्यार्थिनी गणेशमूर्तींचे विसर्जन नदी व तलावात करू नका, असे आवाहन करतात. यंदा पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा विचार पुढे आला आणि त्याचे रूपांतर कृतीत झाले. पर्यावरणशास्त्र अधिविभागात गौरव काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली 115 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी दहा प्रकारच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना आकार दिला. या मूर्तींमध्ये झेंडू, डेलीच्या बिया रुजविल्या असून, मूर्तींचे कुंडीत विसर्जन करण्यात येणार आहे. याच बियांतून वाढणाऱ्या रोपांतून फुले उमलणार आहेत. 

कार्यशाळेत सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी याच मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा निर्धार केला. या वेळी प्रा. डॉ. पी. डी. राऊत, विज्ञान परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव पवार उपस्थित होते. डॉ. पल्लवी भोसले यांनी आभार मानले.