मंत्री सुभाष देसाई यांचा राजीनामा हे नाटक : विखे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

शिर्डी : भ्रष्टाचाराच्या आरोपाने घेरलेले शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे देऊ केलेला राजीनामा म्हणजे नाटक होते. आपली मलिन प्रतिमा सावरण्यासाठी शिवसेनेने केलेला हा 'डॅमेज कंट्रोल'चा केविलवाणा प्रयत्न होता. मुंबई महापालिकेपासून ते घाटकोपर दुर्घटनेपर्यंत शिवसेनेने आजवर भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशीच घातले आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी केली. 

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ''मंत्री देसाई यांच्यावर विरोधकांनी पुराव्यानिशी आरोप केले. त्यावर त्यांनी हा गैरव्यवहार पूर्वीच्या सरकारचा असल्याचा कांगावा केला. तसे असेल, तर ते मंत्रिपदाच्या काळात तीन वर्षे झोपले होते का? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कानावर हात ठेवत होते आणि आज अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सादर करण्याचे नाटक कशासाठी केले?'' 

''घाटकोपर दुर्घटनेत 17 जणांचा बळी गेला. त्या मागे मुंबई महापालिका व शिवसेना कार्यकर्त्यांचा भ्रष्टाचार कारणीभूत होता, हे स्पष्ट झाले. 'आरजे' मलिष्काने महापालिकेतील भ्रष्टाचारावर नेमके बोट ठेवताच शिवसेनेच्या नाकाला मिरच्या झोंबल्या. शिवसेनेत नैतिकता शिल्लक असती, तर मंत्री देसाई यांच्यावर तातडीने कारवाई करणे अपेक्षित होते. त्यांनी राजीनामा द्यायचा आणि मुख्यमंत्र्यांनी फेटाळायचा, हे नाटक म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न आहे,'' अशी टीका विखे पाटील यांनी केली.