पांगरीत दमदार पाऊस; पाथरी तलावाचा सांडवा सुटला

बाबासाहेब शिंदे
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

पांगरी (ता.बार्शी) : पांगरीसह भागात काल (ता.14) रात्री अकरा वाजेच्या सुमारास चालू झालेल्या दमदार पाऊस 89 मिलिमीटर झाला. या पावसाने शंभर वर्षांपूर्वी बांधलेला पाथरी तलावाचा सांडवा सुटला असून तलावाचे पाणीपूजन धानोरेचे सरपंच सुमंत गोरे यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आले. यावेळी पाथरीचे दयावान गायकवाड, नानासाहेब गायकवाड, उपसरपंच हनुमंत गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

गेल्या आठ दिवसापासून परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. चोराखळी, ममदापूर, गोरमाळे, कारी, पांढरी, उक्कडगाव परिसरातील लहानमोठे तलाव पूर्ण पाणी क्षमतेने भरून वाहू लागले होते.

आज (ता.15)सकाळी या भागातील सर्वात मोठा तलाव असलेला पाथरी तलावाचा सांडवा सुटला आहे. या तलावातील मागील काही वर्षांत गाळ उपसल्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे.

परिसरात दिवसभर तीव्र उन्हासह उकाडा जाणवत असून रात्री वेळी दमदार पाऊस पडत असलेला आजच तिसरा दिवस आहे.या पावसाने शेतात काढणीस आलेला उडीद, मूग पीक काढणे जिकिरीचे झाले आहे. शेतात दलदल तर अनेक ठिकाणी पाणी वाहत असल्याने उडीद, मूग पिकांस फटका बसून उगवण्याची भीती निर्माण झाली आहे. नगदी पिक म्हणून खरिप पिकाकडे पाहिले जाते. या पिकांच्या उत्पादनावरच दिवाळीचा सण आनंदी जात असतो. मात्र पाऊसाने उघडीप न दिल्याने उत्पादनास फटका बसणार आहे.

तूर पिकाबरोबर कांदा पिकांची लागवडीत वाढ होत आहे. या पिकांना अतिरिक्त ओलावा लागल्याने पिके पिवळी पडू लागली आहेत. या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेतातील सर्व कामे ठप्प झाली आहेत. आतापर्यंत पडलेले पाऊस मारक होता. मात्र यापुढे सलग पाऊस पडत राहिल्यास हानिकारक ठरणार आहे. या पावसाने अनेक घराच्या भिंती पडल्या असून ठिकठिकाणी पाऊसाचे पाणी रस्त्यावर येऊन खड्डे पडले आहेत.

तालुक्यात काल (ता.14)पर्यत सर्व मंडलमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. त्याची आकडेवारी पुढीलप्रमाणे :

पांगरी-89, बार्शी-27, आगळगाव-27, वैराग-5, उपळे-19, गौडगाव-44, पानगांव-24, नारी-96, सर्डी-15, खांडवी-16 असे एकूण 597.85 मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली असून आज (ता.15)पर्यत पांगरी येथील पर्जन्यमान 667 मीलीमीटर नोंद  झाली असल्याची माहिती बार्शी तहसील कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.