डॉल्बीचा गर्भवती महिलांना धोका जास्त 

डॉल्बीचा गर्भवती महिलांना धोका जास्त 

कोल्हापूर : विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष एक गर्भवती महिला पहात होती. या मिरवणुकीत डॉल्बीचा दणदणाट सुरू होता. पाच दहा मिनिटे ती त्याचा आनंद घेऊ लागली अनं अचानक तिला चक्कर आली. ऐन मिरवणुकीत ती पोटावरच पडली. अंतर्गत रक्तस्त्रावाने तिची प्रकृती चिंताजनक बनली. तातडीने तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. डॉक्‍टरांनी अथक प्रयत्न करून तिचे आणि तिच्या बाळाचे प्राण वाचविण्यात यश मिळवले. तीन वर्षांपूर्वीची ही घटना आजही डॉक्‍टरांकडून गर्भवती महिलांना सांगून डॉल्बीपासून दूर राहा, असा सल्ला दिला जात आहे. 

डॉल्बीच्या दणदणाटाचे आरोग्यावर घातक परिणाम होतात. हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. डॉल्बीच्या सानिध्यात राहिल्याने ऐकू न येण्यापासून कानाचे, मेंदू, रक्तदाब, हृदयाचे आजार निर्माण होतात. याचा गर्भवती महिलांना धोका अधिक असतो. याबाबत कितीही प्रबोधन केले तरी कळते; पण वळत नाही, असे चित्र सध्या शहरात दिसत आहे. विसर्जन मिरवणुकीतील डॉल्बीच्या दणदणाटाच्या सानिध्यात राहिल्याने हृदय रुग्णांच्या संख्येत सरासरी 35 टक्‍क्‍यांनी तर गर्भवती महिलांच्या प्रकृतीला धोका पोचण्याची शक्‍यता 25 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढत असल्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासावरून पुढे आले आहे. 

डॉल्बीच्या सानिध्यात येणाऱ्या गर्भवती महिलांना आवाजाने चक्कर येणे, धाप लागणे, डोकेदुखी, नाडीचे ठोके वाढणे, झोप न लागणे, रक्तदाबाचे आजार वाढतात. नवजात बालके डॉल्बीच्या आवाजाने दचकतात. त्यांच्यात कानाचे आजार उद्‌भवतात. अशा महिलांनी डॉल्बीच्या दणदणाटापासून दूर रहावे, असा सल्ला डॉक्‍टरांकडून प्रथम दिला जातो. डॉल्बीतील इलेक्‍ट्रीक सिस्टीममुळे छातीची धडधड वाढते. नाडीच्या ठोक्‍यासह रक्तदाब वाढतो. या आवाजाचा दणका मेंदूलाही बसू शकतो. डॉल्बीच्या मिरवणुकीनंतर हृदयासंबधीच्या रुग्णांच्या संख्येत सरासरी 35 टक्के वाढ होत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञाकडून सांगण्यात येते. डॉल्बी दणदणाटाच्या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना या आवाजाच्या तीव्रतेचा फटका बसतो. त्यापुढील चार ते पाच दिवस त्यांना कानात बसलेल्या आवाजाच्या तीव्रतेमुळे त्रास जाणवू लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी डॉल्बीच्या दणदणाटाचा मोह आवरा असा सल्ला डॉक्‍टरांकडून दिला जातो. 

डॉल्बी दणदणाटाच्या सानिध्यात राहिल्याने गर्भवती महिलांच्या नाडीचे ठोके वाढणे, चक्कर येणे, झोप न लागणे, रक्तदाब वाढणे, डोके दुखणे असे आजार होऊ शकतात. त्यामुळे अशा महिलांनी दणदणाटापासून दूर रहावे. 
- डॉ. सरोज शिंदे (स्त्रीरोगतज्ज्ञ) 

डॉल्बीच्या दणदणाटामुळे छातीत धडधडण्यापासून चक्कर येणे, रक्तदाब वाढणे, हृदयाचे विकार उद्‌भवतात. याचा विचार प्रत्येकाने करावा. क्षणिक आकर्षणापासून दूर राहून दणदणाटाचे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामाचा विचार करावा. 
- डॉ. चंद्रकांत पाटील (हृदयरोगतज्ज्ञ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com