कास पठाराकडे दुपारी दोनपासून एकेरी वाहतूक : विजय शिवतारे 

सिद्धार्थ लाटकर
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

सातारा : कास पठाराकडे जाणारी वाहतूक एकेरी स्वरुपात दुपारी दोनपासून सुरु केली जाईल. त्यासाठी कठड्याची पडलेली रिटेनिंग वॉल तातडीने बांधण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे. रविवारी (ता.1) कासकडे गेलेल्या सर्व पर्यटकांना सुरक्षित साताराकडे आणण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास केल्याची माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी 'ई-सकाळ'ला दिली. 

कास पठाराकडे जाणारा रस्ता यवतेश्‍वर घाटात खचल्याने आज (सोमवार) सकाळी आठपासून साताराहून कासकडे जाणारी वाहतूक जिल्हा प्रशासनाने बंद केली. सकाळी आठच्या सुमारास कासहून सातारामध्ये येणाऱ्या ग्रामस्थांना रस्ता खचल्याचे निदर्शनास आले. काहींनी मोबाईलवर छायाचित्र काढून परिचितांना सोशल मीडियाद्वारे पाठविले. अवघ्या काही मिनिटांत ही छायाचित्र व्हायरल झाली. रस्ता खचल्याची माहिती वनविभाग, पोलीसांना समजताच त्यांनी बोगदानजीक साताराहून कासकडे जाणारी वाहतूक बंद केली. 

कासला मुक्कामी गेलेले पर्यटक व दैनंदिन कामासाठी येणारे ग्रामस्थ मात्र एकेरी मार्गातून येत होते. जवळपास निम्मा रस्ता खचल्याने प्रशासनाने एकेरी मार्ग देखील तात्पुरता बंद केला. हा प्रकार पालकमंत्री विजय शिवतारे यांच्यापर्यंत पोहचल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना उपाययोजना आखण्यासंदर्भात सूचना केल्या. 

'ई-सकाळ'शी बोलताना पालकमंत्री म्हणाले, "यवतेश्‍वर घाटात रस्त्याच्या कठड्याची रिटेनिंग वॉल पडली. यामुळे अर्धा रस्ता खचला. या प्रकाराची माहिती समजताच जिल्हाधिकाऱ्यांना पर्यटक आणि ग्रामस्थांची सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. डोंगरकडेच्या बाजूची जागा भराव टाकून वाहतूक एकेरी होईल यासाठी प्रयत्न करावेत. तसेच पडलेली रिटेनिंग वॉल तात्पुरत्या स्वरुपात तातडीने बांधून घ्यावी. पक्के बांधकाम करण्यासाठी सर्व्हे करावा. तसेच आवश्‍यकता भासल्यास कासहून येणाऱ्या पर्यटकांच्या मोठ्या गाड्या थांबवून प्रशासनाने केलेल्या वाहनातून सातारापर्यंत सोडण्याचे ही सांगण्यात आले आहे.''