आरटीओतील पासिंगमुळे वाहनधारक बेजार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

कोल्हापूर : 'उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अधिनियमानुसार राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात आवश्‍यक सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे रिक्षा, ट्रक, टॅक्‍सी आदी वाहनांचे पासिंग वेळेत होत नसल्याने वाहनधारक बेजार झाले आहेत. याबाबत गुरुवारी (ता. सात) पुण्यात वाहनधारकांची बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल,' असे महाराष्ट्र राज्य वाहनचालक-मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

शिंदे म्हणाले, ''उच्च न्यायालयाने वाहनांच्या पासिंगबाबत राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांत (आरटीओ) 250 मीटरचा ब्रेक टेस्ट ट्रॅक असला पाहिजे. वाहनांचे पासिंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर केले गेले पाहिजे असे नियम घालून दिले आहेत; मात्र राज्यातील 52 आरटीओ कार्यालयांत अशा पद्धतीचा ट्रॅक अगर ब्रेक टेस्टिंग, व्हिल अलाईन्मेंट अशा प्रकारच्या सुविधा नाहीत. याबाबत शासनानेही न्यायालयाकडे खुलासा केलेला नाही. केवळ मुदत मागणीचे काम केले. त्याची मुदत 30 सप्टेंबरला संपते. न्यायालयाच्या आदेशाला घाबरून अनेक आरटीओ कार्यालयांत पासिंगचे कामच बंद करण्यात आले आहे. याचा फटका वाहनधारकांना बसू लागला आहे. वेळेत पासिंग न झाल्याने दिवसाला 50 रुपये दंड, कारवाई झाली तर मालकाला तीन, तर चालकाला दोन हजार रुपये दंड, अपघात झाला तर पासिंगविना विम्याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे अनेक वाहनचालकांनी वाहने दारात लावली आहेत. त्यामुळे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याबाबत राज्यातील सर्व वाहनधारकांची गुरुवारी (ता. सात) पुण्यात बैठक बोलाविण्यात आली आहे. त्या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. या बैठकीस राज्यातील वाहनधारक संघटनेच्या पदाधिकारी, सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले. 

दरम्यान, कोल्हापूर आरटीओ कार्यालयात वाहनांचे पासिंग सध्या शियेफाटा येथे केले जाते; मात्र न्यायालयाच्या नियमानुसार होत असणारे हे पासिंग काटेकोर पद्धतीने केले जाते. एक वाहन पाच ते सहा अधिकारी तपासतात. त्यामुळे बारीकसारीक त्रुटी समोर येतात. त्यामुळे वाहनांचे पासिंग होत नाही. याबाबत आज सर्व रिक्षासंघटना, टेंपो, टॅक्‍सी संघटनांनी वाहन धारकांना वाहनांचे पासिंग करू नका असे आवाहन केले. गांधीगिरी पद्धतीने केल्या जाणाऱ्या या आंदोलनास वाहनधारकांनीही प्रतिसाद दिला. त्यामुळे आज आरटीओचा पासिंग विभाग ठप्प होता. याबाबत सुभाष शेट्टी, ईश्‍वर चैन्नी, राजू जाधव, मोहन बागडी, बाबा इंदूलकर, विजय गायकवाड आदी सर्व संघटनांचे पदाधिकारी एकत्रित येऊन पुढील आंदोलनाची भूमिका ठरवणार असल्याचे राजू जाधव यांनी सांगितले.