पत्नी व मुलांच्या खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप

हरिभाऊ दिघे
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

तळेगाव दिघे ( जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील चिंचोलीगुरव येथे राहत्या घरात पत्नी व मुलांच्या केलेल्या खून प्रकरणी आरोपी ज्ञानदेव उर्फ ज्ञानेश्वर जगन्नाथ सोनवणे यास संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयांचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. शर्मा यांनी जन्मठेपेची ( सश्रम आजीवन कारावास ) शिक्षा सुनावली.

चिंचोलीगुरव येथे आरोपी ज्ञानदेव सोनवणे याने ता. १३ फेब्रुवारी २०१४ रोजी राहत्या घरात पत्नी अलका ज्ञानदेव सोनवणे ( वय ३५ ), मुलगा बाबासाई ज्ञानदेव सोनवणे ( वय ३ ), मुलगी अपेक्षा ज्ञानदेव सोनवणे ( वय ४ ) यांना विषारी औषध पाजून गळा आवळून जीवे ठार मारले होते. गाय घेण्यासाठी माहेरून ५० हजार रुपये न आणल्याने व पत्नी अलका हिच्यावर संशय घेत हे खून करण्यात आले होते.

मयत अलका हिचा भाऊ सोमनाथ पोपट मोढे ( रा. सायाळे ता. सिन्नर ) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात ३०२ व ४९८ ( अ ) कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. सहायक पोलीस निरीक्षक आर. टी. धारबळे यांनी या गुन्ह्याचा तपास केला, तर पोलीस निरीक्षक संजय भामरे यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते.

सदर खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. शर्मा यांच्यासमोर झाली. सदर गुन्ह्यात एकही एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना गुन्ह्यातील तपासी अंमलदार यांनी सादर केलेला परिस्थितीजन्य पुरावा न्यायालयाने ग्राह्य धरला. पत्नी व मुलांचा खून केल्याप्रकरणी दोषी धरून न्यायमूर्ती शर्मा यांनी आरोपी ज्ञानदेव सोनवणे यास सश्रम आजीवन कारावास, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने कारावास अशी शिक्षा सुनावली. सरकारतर्फे अॅड. मच्छिंद्र गवते यांनी काम पाहिले.