निवडणूक बिनविरोध घ्या; त्याएेवजी शाळा दुरुस्त करा..! 

सनी सोनावळे
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

ढाकळी टोकेश्‍वर (ता. पारनेर) : तालुक्‍यातील 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करून त्या निवडणुकीत होणारा खर्च गावातील नादुरुस्त शाळांसाठी वापरावा. यासाअठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत हा निर्णय घ्यावा, असे आवाहन पारनेर पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे यांनी केले. यासाठी हवी ती मदत करण्यास पुढाकार घेण्याची तयारीही त्यांनी दर्शविली. 

या संदर्भात झावरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे भूमिका मांडली. तालुक्‍यातील गोरेगाव, भाळवणी, पुणेवाडी, ढवळपुरी, वनकुटे, पळशी या मोठ्या गावांसह एकूण 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर झावरे यांनी हा प्रस्ताव मांडला. झावरे यांच्या भोंद्रे या गावाचाही निवडणूक होणाऱ्या गावांमध्ये समावेश आहे. 

'ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये पक्षीय भूमिका मांडल्या गेल्या, तर गावांमध्ये गट-तट निर्माण होऊन तणाव निर्माण होण्याची शक्‍यता असते. दुसरीकडे निवडणूक लढविण्यासाठी पॅनेल तयार करून मोठ्या प्रमाणात खर्चही केला जातो. तालुक्‍यातील 100 ते 125 प्राथमिक शाळा आजही उघड्यावर भरतात. निवडणुकांच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च केले जातात. याचा विचार होण्याची गरज आहे. निवडणुकीत होणारा खर्च शाळांच्या दुरुस्तीसाठी वापरला जाऊ शकतो', अशी भूमिका झावरे यांनी मांडली आहे. 

'निवडणुकीतील वादांमुळे आणि विषमतेमुळे ग्रामविकासात खंड पडतो. त्यामुळे तालुक्‍यातील सर्व ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करून नव्या पर्वाला सुरवात करावी', अशी विनंतीही झावरे यांनी केली आहे.