चालत्या गाडीवर झाड कोसळले: गाडी अडकली; पण कुणीही जखमी नाही

चालत्या गाडीवर झाड कोसळले: गाडी अडकली; पण कुणीही जखमी नाही

पांगरी (जि. सोलापूर) : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे चालत्या वाहनांवर  झाड कोसळून मोठी घटना घडली. मात्र त्या चार तरूणाचे नशीब बलवत्तर त्यातून ते सुखरूप बाहेर पडले. यात गाडीवर झाडांचा बुंधा पडल्याने नुकसान झाले. ही घटना आज (शनिवार) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास बार्शी- लातूर रस्त्यावर चिंचोली (ता.बार्शी) हद्दीतील निळकंठेश्वर मंदिरासमोर घडली.

या घटनेने दोन्ही बाजूची वाहतूक जवळपास दोन तास ठप्प झाली होती. सुदैवाने वाचलेल्या तरूणांची नावे नितीन आटाळे (वय 40), महेश मारणे (वय 35), अमोल उभे (वय 34), अंकुश गुंड (33) (रा. सर्व कोथरूड पुणे) असे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे येथील तरूण कार गाडी (क्र. एम. एच.12 एन यू 1371) यातून कळंब तालुक्यातील एक कारखाना स्थळावर असलेल्या नातेवाईकांच्या लग्नकार्यासाठी जात होते. चिंचोली हद्दीतील निलकंठेश्वर मंदिरासमोर जवळपास सत्तर-ऐंशी वर्षे जुने असलेले भले मोठे चिंचेचे झाड कार गाडीवर कोसळले. त्यात चालू स्थितीत असलेल्या कारसह चारही तरूण अडकले. त्यातून ते कसेबसे स्वतः बाहेर पडले.

झाड मोठे असल्याने बाहेरून पाहिले तरी गाडी दिसू शकत नव्हती. त्यानंतर घटनेची माहिती कळताच आसपासच्या पांगरी पंचक्रोशीतील लोक मदतीसाठी धावून आले. त्यानंतर कटर मशीनने पडलेल्या झाडाचे फांद्या कापत गाडी बाहेर काढण्यात आली. यावेळी दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.

हे अतिशय जुनाट चिंचेचे झाड रस्त्यालगत होते. हे कमकुवत होऊन रस्त्याच्या बाजूस झुकले असल्याची बाबी काही लोकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती. तरीही अधिका-यांनी ही बाब गांभीर्याने न घेता दुर्लक्ष केले. दुर्घटनेस कारणीभूत असलेल्या अधिका-यांवर पोलीसांत गुन्हा दाखल करण्याबाबत चर्चा सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com