'जय भवानी..जय शिवाजी'च्या गजरात 'शिवशाही' रवाना 

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

हुतात्मा एक्‍स्प्रेसचे आरक्षण कायम फुल्ल असते. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. 'शिवशाही' सुरू करून महामंडळाने पुण्याला जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांची सोय केली आहे. 
- विजय देशमुख, पालकमंत्री परिवहन राज्य मंत्री

सोलापूर : पहाटे साडेपाचची वेळ... सोलापूर एसटी स्थानकावर सुरु असलेला गलका... येणाऱ्या-जाणाऱ्या एसटींची ध्वनिक्षेपकावरून वारंवार केली जात असलेली उद्‌घोषणा.. अशा वातावरणात धुळीने माखलेल्या, दूरवस्था झालेल्या एसटींच्या गर्दीत नववुधप्रमाणे सजविलेली देखणी आणि रुपवान 'शिवशाही' एसटी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. पालकमंत्र्यांच्या हस्ते पूजा झाल्यावर ही वातानुकुलित एसटी पुण्याकडे रवाना झाली. त्यावेळी उपस्थितांनी जय भवानी..जय शिवाजीच्या घोषणा दिल्या. 

'शिवशाही'च्या प्रवासाचा आज पहिला दिवस असल्याने एसटी महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पहाटे पाचपासूनच स्थानकात ठिय्या मांडला होता. ही एसटी अधिकाधिक कशी सजविता येईल यासाठी प्रयत्न केले जात होते. महिला कर्मचाऱ्यांनी एसटीसमोर रांगोळी काढली, तर इतरांनी फुलांनी सजविले. सव्वासहाच्या सुमारास जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख आले. त्यांचे महिला कर्मचाऱ्यांनी औक्षण केले. श्री. देशमुख व विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांच्या हस्ते पूजा झाली. स्थानकातून बाहेर पडल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याला अभिवादनाचा वळसा घालून 'शिवशाही'पुण्याकडे मार्गस्थ झाली. 

पुण्याला जाण्यासाठी सध्या सोलापूरकरांसमोर 'हुतात्मा एक्‍स्प्रेस'हीच पर्याय होती. हुतात्मामधून वातानुकुलित प्रवासासाठी अंदाजे साडेचारशे रुपये लागतात, मात्र 'शिवशाही'तून प्रवासासाठी 395 रुपये मोजावे लागणार आहेत. 'हुतात्मा' ज्यावेळेत पुण्यात पोचते, त्याच वेळेपर्यंत शिवशाहीही पोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 'शिवशाही' सकाळी सहा वाजता सोलापुरातून निघून पुण्याला 10 वाजून 50 मिनिटांनी पोचेल. परतीच्या प्रवासात सायंकाळी सहा वाजता निघून सोलापुरात रात्री 11 वाजून 5 मिनिटांनी पोचणार आहे. 

महापालिकेचे सेवानिवृत्त सार्वजनिक आरोग्य अभियंता सु. ल. जोशी हे या एसटीचे पहिले प्रवासी ठरले. पुण्याला 'शिवशाही'तूनच जायचे असे त्यांनी ठरविले होते. त्यामुळे पुण्याला जाणाऱ्या साध्या, एशियाड बसमध्ये ते बसले नाहीत. प्रवाशांअभावी ही एसटी बंद पडू नये, ती कायम प्रवाशांनी गच्च भरली पाहिजे यासाठी सोलापूरकरांनीही पुढाकार घेणे गरजचे आहे, अशी प्रतिक्रिया श्री. जोशी यांनी 'सकाळ'ला दिली. त्यांच्यासह इतर प्रवाशांचा पालकमंत्र्यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.