आंदोलनाच्या समित्यांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रतिज्ञापत्र अनिवार्य - अण्णा हजारे

Anna Hajare
Anna Hajare

राळेगणसिद्धी (नगर) : राज्यातील भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या सर्व समित्या तीन वर्षांपुर्वीच बरखास्त केल्या आहेत. त्यामुळे त्या समित्यांमध्ये असलेले सदस्य व कार्यकर्ते आता राहिले नाहीत. नव्याने ज्यांना भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या विविध समित्यांमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांना प्रतिज्ञापत्र अनिवार्य असून तेच या आंदोलनाच्या विविध समित्यात घेतले जातील व आंदोलनाशी जोडले जाणार असल्याचे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्राकाद्वारे जाहीर केले आहे.     

जे कार्यकर्ते असे प्रतिज्ञापत्र भरून देतील त्यांनाच या समित्यामध्ये घेऊन त्यांना ट्रस्ट कडून ओळखपत्र ही दिले जाईल. भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास ही संस्था 30 वर्षापुर्वी 1997 साली स्थापन झाली. या काळात माहितीचा अधिकार, ग्रामसभेला जादा अधिकार, दप्तर दिरंगाई, बदल्यांचा कायदा, जनतेची सनद या सारखे जनहिताचे व राज्य हिताचे कायदे सरकार करत नव्हते. केवळ जनशक्तीचा दबावामुळे सरकारला हे कायदे करणे भाग पडले आहे. तसेच पतसंस्था, वाळु उपसा, दारूबंदी सारखे सामाजिक विषय घेऊन व्यवस्था बदलाच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले. त्याचा ही उपयोग जनतेला होत आहे.

पतसंस्थेमधील गरीब सामान्य जनतेच्या ठेवी मिळाव्यात म्हणून सरकारला दोनशे कोटी रुपये पंतसंस्थांना मदत करण्यास भाग पाडले. गेल्या तीस वर्षांत विदेशातुन किंवा देशातील उद्योगपती, धनिकांची आर्थिक मदत घेतली नाही. केवळ दोनशे पाचशे रूपयांची मदत घेतली तीही चेक किंवा ड्राफ्टने घेतली. रोकड पैसा स्वीकारल नाही. सरकारने कॅशलेस व्यवहार अता सुरू केला आहे आम्ही तीस वर्षांपासून कॅशलेसचे अनुकरण केले आहे. अनेकांनी आरोप केले तरी त्याचा परिणाम आमच्या संस्थेच्या कामावर झाला नाही.

भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना चारित्र्याला जपावे लागते. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्रभर दौरे करून संघटन उभे केले. मात्र आंदोलनातील काही कार्यकर्ते गैर व्यवहार करतात. अशा बातम्या आल्यामुळे महाराष्ट्रातील 33 जिल्ह्यातील 252 तालुक्यातील संघटन तीन वर्षापुर्वी बरखास्त केले आहे. आता नव्याने चारित्र्यावर आधारलेल्या कार्यकर्त्यांचे संघटन उभे करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी प्रतिज्ञा पत्र भरून देणाऱ्या कार्यकर्त्यांना जोडण्याचा काम सुरू केले आहे. अनेक कार्यकर्ते मी कधीच पक्षात जाणार नाही निवडणुक लढविणार नाही, मी समाज, राष्ट्राची सेवा करील. चारित्र्य, आचार, विचार शुद्ध ठेवीन अशी प्रतिज्ञा पत्र भरून देत आहेत.     उद्देश हाच आहे की, सरकारी तिजोरीतील पैसा जनतेचा आहे, तो पैसा कोठे व कसा खर्च होतो? याकडे या कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवावे. कारण जनता ही देशाची मालक आहे. भ्रष्टाचाराचे पुरावे मिळाले तर सरकारकडे चौकशीचा आग्रह धरणे, गरज पडल्यास अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करणे, राज्यात आणि देशात एकाच वेळी आंदोलने झाली तर सरकारला निर्णय घ्यावा लागेल अन्यथा जावे लागेल हा उद्देश या संघटन निर्मितीचा आहे. यातून भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणावर आळा बसेल असेही शेवटी हजारे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com