नवीन बांधकामांसाठी क्षारयुक्त वाळूचा वापर 

नवीन बांधकामांसाठी क्षारयुक्त वाळूचा वापर 

मल्हारपेठ - जिल्ह्यात वाळू उपशावर बंदी आल्याने व्यावसायिकांनी आता कोकणातील क्षारयुक्त वाळूवर लक्ष केंद्रित केले आहे. क्षारयुक्त असूनही कोकणातील ही महागडी वाळू बांधकामांसाठी वापरली जात आहे. त्यातून बांधकामांच्या गुणवत्तेचा प्रश्‍न निर्माण होत आहे. त्याशिवाय क्षारयुक्त वाळूमुळे जादा सिमेंट वापरावे लागत असल्याने बांधकाम करणारांचे आर्थिक बजेटही कोलमडताना दिसते. 

जिल्ह्यात वाळू उपशावर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे सध्या वाळूउपसा बंद आहे. चोरून वाळूचा उपसा, वाहतूक व विक्री होत असली तरीही त्याचे प्रमाण अल्प असल्याने सध्या बांधकामांसाठी वाळू कमी पडत आहे. वाळूउपसा बंदीमुळे बांधकाम आणि वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. काहीच दिवसांपूर्वी ठिकठिकाणी गावोगावच्या ओढ्यातील वाळूउपशा करण्यात आला. ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्यावर सर्वत्र कारवाई झाली. अवैध वाळूउपसा करणाऱ्यांवर "मोका' लावण्याची तयारी सुरू झाल्याचे दिसताच चोरटा वाळूउपसा काही प्रमाणात थांबलेला दिसतो. 

क्षारयुक्त वाळूचे दरही गगनाला 
बांधकाम व्यावसायिकांना लागणारी वाळू व मागणीचा विचार करून जिल्ह्यातील वाळू व्यावसायिक आता कोकणातील समुद्राच्या वाळूकडे वळाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून कोकणातून मोठ्या प्रमाणात वाळू या भागात आणली गेली आहे. त्या वाळूचा एका ब्रासचा दर आठ ते नऊ हजार रुपये आहे. एका गाडीचा दर जवळपास 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत जातो. सातारा, महाबळेश्वर, कऱ्हाड, वाई तालुक्‍यांत पाटणमार्गे वाळू वाहतूक होत आहे. शासन स्थानिक वाळू उपशावर बंदी घालत असल्यामुळे गावोगावच्या जनतेतून शासनाच्या विरोधात असंतोष आहे. 

बांधकामांच्या गुणवत्तेचा प्रश्‍न 
क्षारयुक्त वाळू बांधकामाला वापरणे धोक्‍याचे आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय कामांना वाळू वापरली जात असेल तर त्याची गुणवत्ता  आणि दर्जाचे काय, असा प्रश्न आहे. समुद्राच्या क्षारयुक्त वाळूवर बांधकाम व्यावसायिक काम उरकत आहेत. क्षारयुक्त वाळू पाण्याने धुवून वापरा, असा जावई शोध काही ठिकाणी काढल्यामुळे दुधाची तहान ताकावर भागवली जात आहे. घरमालकही पर्याय नसल्याने अवाजवी दराने क्षारयुक्त वाळू घेताना दिसत आहेत. वाळूला पर्याय म्हणून ग्रीड, दगडी पावडरही पुढे येत आहे. त्याचा दर वाढला आहे. क्षारयुक्त वाळूच्या वापरामुळे बांधकामाला पोपडे सुटून बांधकाम ढासळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. क्षारयुक्त वाळूच्या वापराने सिमेंटचे प्रमाण वाढवावे लागत आहे. त्यातून बांधकामाचे आर्थिक बजेट कोलमडत आहे. 

गावोगावी घरकुलांची कामेही रखडली 
प्रधानमंत्री आवास योजनेची घरकुले मंजूर झालेल्या गावांत वाळूच्या कमतरतेमुळे ही कामे रखडली आहेत. या स्थितीत घरकुलांसह अन्य शासकीय कामांसाठी समुद्रातील क्षारयुक्त वाळू वापरण्याचा पर्यायही वापरला जाऊ शकतो. पण, ते गुणवत्तेच्या दृष्टीने कितपत योग्य आहे, याचा विचार झाला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com