साहित्य संमेलन भरविण्यास भिलारकर उत्सुक

साहित्य संमेलन भरविण्यास भिलारकर उत्सुक

भिलार - अखिल भारतीय साहित्य संमेलन पुस्तकांचं गाव भिलारला घेतल्यास त्याचा सर्व खर्च सरकार करेल, असे खुले निमंत्रण सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी बडोद्यातील सयाजीराव गायकवाड साहित्यनगरीत केले. तावडेंच्या निमंत्रणाचे साहित्यिकांनी सकारात्मकतेने स्वागत केल्यास भिलारच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाईल. भिलारकरांनीही या निमंत्रणाचे स्वागत केले आहे.

भिलार या स्ट्रॉबेरीच्या गावाला शासनाने देशातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून विकसित केले आहे. देशी-विदेशी पर्यंटकांची वर्दळ भिलारमधील शेतकऱ्यांच्या बांधावर वाढल्याने विनोद तावडे यांनी हेरली आणि देशातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून भिलार आकाराला आले. साहित्यिक वातावरणाने  भिलार आणखी समृद्ध होऊ लागले आहे. पुस्तकांच्या गावामुळे साहित्यिक, राजकीय, पर्यटकांची पावले भिलारकडे वळू लागली. भिलारचे समाजकारण, अर्थकारण, वातावरणच बदलून गेले. तावडेंच्या प्रयत्नांनी भिलारचे रुपडेच पालटले. विविध साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल भिलारमध्ये होऊ लागली आहे.

बडोदा येथे सुरू असणाऱ्या साहित्य संमेलनात तावडे यांनी पुढील साहित्य संमेलन भिलारला घेण्याचे निमंत्रण दिले. या संमेलनाचा सर्व खर्च शासन करेल, असेही त्यांनी जाहीर करून साहित्य वर्तुळात आश्‍चर्याचा धक्काच दिला आहे. ग्रामस्थांनीही या निमंत्रणाचे स्वागतच केले आहे. हे साहित्य संमेलन पुस्तकांच्या गावात झाल्यास भिलारला आणखी महत्त्व प्राप्त होणार आहे. यापूर्वी महाबळेश्‍वरकरांनी साहित्य संमेलन यशस्वी करून दाखवले आहे. निसर्गाच्या सानिध्यात आणि स्ट्रॉबेरीच्या मळ्यात मराठीच्या जडण-घडणीसाठी चर्चा घडेल, यासाठी भिलारकर आत्तापासूनच साहित्यिकांच्या स्वागतासाठी आसुसलेले आहेत.

पुढील साहित्य संमेलन पुस्तकांच्या गावात घेण्याच्या निमंत्रणाचे ग्रामस्थ स्वागतच करीत आहोत. पुस्तकांच्या गावासाठी आम्ही एकवटलोय. भिलारला संमेलन घेतल्यास ते यशस्वी करण्यासाठी तन, मन, धन अर्पून प्रयत्नशील राहू. 
- बाळासाहेब भिलारे, ज्येष्ठ नेते

साहित्य संमेलन भिलारच्या तांबड्या मातीत भरणे ही महाबळेश्वर तालुकावासीयांसाठी अभिमानाचीच बाब आहे. जिल्ह्यातील साहित्यिक व साहित्यप्रेमी हे संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वांत पुढे राहतील. 
- जगन्नाथ शिंदे, लेखक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com