मालवाहू ट्रक-दुचाकी अपघातात दोघे जखमी; एकाचे पाय निकामी

हरिभाऊ दिघे
रविवार, 9 जुलै 2017

मालवाहू ट्रक व दुचाकीचा अपघात होत दोघे युवक गंभीर जखमी झाले. तळेगाव-लोणी रस्त्यावर वडझरी खुर्द गावात रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली.

तळेगाव दिघे (जि. नगर) - मालवाहू ट्रक व दुचाकीचा अपघात होत दोघे युवक गंभीर जखमी झाले. तळेगाव-लोणी रस्त्यावर वडझरी खुर्द गावात रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली.

लोणीच्या दिशेने चाललेला मालवाहू ट्रक (क्र. एपी 27 एक्‍स 5747) वडझरी खुर्द गावात रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या दुचाकीवर (क्र. एमएच 17 बीपी 9395) धडकला. झालेल्या अपघातात दुचाकीवरील तान्हाजी बाबासाहेब राऊत (वय 26) यांच्या दोन्ही पायांना जबर मार लागल्याने त्यांचे पाय निकामी झाले, तर अशोक वेताळ (वय 17) यांना जबर मार लागला. जखमी तान्हाजी राऊत यांना शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात उचारार्थ दाखल करण्यात आले. घटनेनंतर अपघातास कारणीभूत चालक मालवाहू ट्रक सोडून पसार झाला. पोलीस पाटील नानासाहेब सुपेकर यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. सहायक फौजदार अशोक जांभूळकर यांनी घटनास्थळी दाखल होत ट्रक ताब्यात घेतला. सदर ट्रक नाशिक येथून कांदा घेवून आंध्रप्रदेशात चालला होता. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येईल, असे सहायक फौजदार अशोक जांभूळकर यांनी सांगितले.