स्पर्धा परीक्षेने केंद्रप्रमुखांची भरती

स्पर्धा परीक्षेने केंद्रप्रमुखांची भरती

सातारा - जिल्हा परिषदांमधील केंद्रप्रमुखांची ४० टक्के पदे सरळसेवेने, ३० टक्के पदे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा व ३० टक्के पदे पदोन्नतीने भरण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. सरळसेवा व विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेने नियुक्तीसाठी शासन अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेणार आहे. 

केंद्रप्रमुखांची १०० टक्के पदे ता. दोन फेब्रुवारी २०१० पर्यंत पदोन्नतीने भरली जात होती. ग्रामविकास विभागाने ता. १० जून २०१४ रोजी केंद्रप्रमुख सेवाप्रवेश नियमावली अधिसूचित केली. त्यानुसार केंद्रप्रमुख पद भरतीसाठी सरळसेवा, विभागीय मर्यादित परीक्षा आणि पदोन्नती हे प्रमाण ४०:३०:३० असे केले. सरळसेवा, विभागीय मर्यादित परीक्षा न झाल्याने मध्यंतरी केंद्रप्रमुख पदोन्नती दिल्या. 

राज्यात ता. दोन फेब्रुवारी २०१० ते ता. दहा जून २०१४ या कालावधीत नियुक्त केंद्रप्रमुखांची नियुक्ती १०० टक्के पदोन्नतीत होत असल्याने त्या शिक्षकांच्या सेवा केंद्रप्रमुखपदावर नियमित करण्यात येत असल्याचे नुकतेच जारी झालेल्या शासन आदेशात म्हटले आहे. दरम्यान ता. दहा जून २०१४ रोजी व त्यानंतर केंद्रप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना पदवीधर पदावर वा समकक्ष पदावर पदावनत करावे, असे शासन आदेशात म्हटले आहे. 

सरळसेवा व विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात येणारी ७० टक्के पदे ही अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षेद्वारे भरली जाणार आहेत. ही परीक्षा २०० गुणांची असेल. अभियोग्यतेसाठी (गणितीय क्षमता, तार्किक क्षमता, वेग आणि अचुकता, भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, कल, व्यक्‍तिमत्त्व) १२० गुण व बुद्धिमत्तेसाठी (आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम-श्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्‍न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी) ८० गुण असेल. रिक्त पदे त्या-त्या निवड प्रक्रियेंतर्गत भाषा, गणित व विज्ञान, सामाजिक शास्त्रे या विषयांसाठी समप्रमाणात भरली जातील.

केंद्रप्रमुखांची सद्य:स्थिती
मंजूर पदे      २२३
कार्यरत पदे      १४३
रिक्‍त पदे      ८०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com