शीतगृहांना कमी दरात अखंड वीज - मुख्यमंत्री

शीतगृहांना कमी दरात अखंड वीज - मुख्यमंत्री

सातारा - शीतगृह प्रकल्पांना चालना देण्यासाठी कमी दरात अखंडित वीज देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली. दरम्यान, शेतीच्या उत्पन्नाला शाश्‍वत करण्यासाठी फूड पार्क हा महत्त्वाचा घटक असून, केंद्राच्या फूड पार्कची योजना अत्यंत जलद गतीने विस्तारत आहे. केंद्राच्या या धोरणाला सुसंगत असेच राज्याने धोरण तयार केले आहे. त्याचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना होत आहे, असेही त्यांनी नमूद केले. 

देगाव (ता. सातारा) येथे गुरुवारी "सातारा मेगा फूड पार्क'चे उद्‌घाटन केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्या वेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार, खासदार उदयनराजे भोसले, खासदार संजय पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, शशिकांत शिंदे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, "सातारा मेगा फूड पार्क'चे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, उपाध्यक्ष विजयकुमार चोले, उमेश माने, संचालक सचिन इटकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ""रासायनिक खतांच्या अति वापरामुळे आपला शेतीशी असणारा संवाद तुटत चालला आहे. जैविक व नॅनो तंत्रज्ञानाच्या वापरामुळे हा संवाद सुरू होऊ शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नवे तंत्रज्ञान पोचविण्याची आवश्‍यकता आहे. शेतीमालाच्या असमतोल उत्पन्नामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. शेतकरी आणि बाजारपेठ यामध्ये असणाऱ्या दरीचा फायदा समाजातील काही घटक घेत असतात. 

या घटकांना आळा घालण्यासाठी फूड पार्क हा महत्त्वाचा भाग ठरणार आहे. देशातील सर्वाधिक शीतगृहाची साखळी राज्यात तयार आहे. शीतगृहास कमी दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तसेच सौर ऊर्जेवर शीतगृह नेण्यासाठी राज्य सरकार प्रोत्साहन देणार आहे. शेतीच्या क्षेत्रात "बीव्हीजी'ने मोठे काम केलेले आहे. "बीव्हीजी' ने नीती आयोगाच्या समोर याविषयी केलेले सादरीकरण अत्यंत प्रभावी होते. त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी केलेली शाश्‍वत शेतीतील यशोगाथा सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. 

केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल म्हणाल्या, ""परिसरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्यासाठी फूड पार्क महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या फूड पार्कमुळे पाच हजार लोकांना रोजगार मिळणार असून, तब्बल 25 हजार शेतकऱ्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे फायदा होणार आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवत आहे. शेतकऱ्यांनी अशा उपक्रमांचा फायदा घ्यावा. फूड पार्क हा मेक इन इंडियासाठी महत्त्वाचा उपक्रम आहे.'' दूध आणि फळांच्या उत्पादनात महाराष्ट्र देशात अग्रेसर असल्याचे कौतुकही त्यांनी केले. 

खासदार शरद पवार म्हणाले ""शेतकऱ्यांचा माल ग्राहकांपर्यंत जाईपर्यंत प्रति वर्षी 50 हजार कोटींचे नुकसान होत होते. त्यामुळे शेतमालावर प्रक्रिया करून त्याचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळवून देण्याची संकल्पना या फूड पार्कची आहे.'' महाराष्ट्रातील पहिला फूड पार्क साताऱ्यात बनला याचा आनंद असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

हणमंतराव गायकवाड म्हणाले, ""फूड इंडस्ट्री ही देशातील सर्वांत वेगाने वाढणारी इंडस्ट्री आहे. सातारा फूड पार्कचे ठिकाण हे मध्यवर्ती ठिकाणी असल्याने या भागात उत्पादित होणाऱ्या स्ट्रॉबेरी, डाळिंब, फणस यांसारख्या फळ भाज्यांवर प्रक्रिया करून ते निर्यात करण्यात येणार आहे. या फूड पार्कच्या माध्यमातून पाच हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.'' प्रारंभी राज्यातील विविध भागांतील शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष उमेश माने यांनी आभार मानले. 

दोन्ही राजांचे सहकार्य असल्यास यश निश्‍चित  
हणमंतराव गायकवाड यांनी त्यांच्या मनोगतात उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगितले. हा धागा पकडत शरद पवार म्हणाले, ""ज्यांना दोन्हीही राजांचे सहकार्य मिळते ते यशस्वी ठरतात हे खरे आहे,'' असे म्हणताच उपस्थितांत एकच हशा पिकला. पुढची दोन वाक्‍यं पूर्ण होताच पवारांनी येथे कारखाने टिकत नसल्याचे स्पष्ट करत त्या खोलात जाण्यापेक्षा हा प्रकल्प टिकावा यासाठी हणमंतराव तुम्हीही खबरदारी घ्यावी, अशी काळजीही व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com