मुख्यमंत्र्यांच्या पक्षबळकटीचे सूत्र काय?

BJP
BJP

सातारा - आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांचे दौरे वाढू लागले आहेत. जिल्ह्यातील दोन आमदार गळाला लागल्याचे भाजपचे पदाधिकारी सांगत आहेत. पण, मुख्यमंत्र्यांच्या या वाढलेल्या दौऱ्यांतून पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पदरात काय पडणार, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याची रणनीती सध्या भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपने आपले पाय पसरले आहेत. आता विधानसभा निवडणुकीवर पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यात भाजपचे एक-दोन आमदार निवडून आणण्यासाठी रणनीती आखली जात आहे. त्यातच अलीकडच्या काही महिन्यांत जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने दौरे वाढू लागले आहेत. या दौऱ्यांतून ते ज्यांच्या कार्यक्रमासाठी आले, त्यांचेच कौतुक करत आहेत. त्यात अनेकजण इतर पक्षातीलच आहेत.

जिल्ह्यात भाजपची ताकद वाढत असताना पक्षाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांच्या पदरी काही तरी पडावे, यासाठी त्यांच्याकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. नुकतीच जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी कऱ्हाडात पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या गळाला जिल्ह्यातील दोन आमदार लागल्याचा गौप्यस्फोट केला. यानंतर जिल्ह्यात सर्वांचे तर्कवितर्क सुरू झाले. आतापर्यंत जिल्ह्यात भाजपने राष्ट्रवादीतील नाराज नेत्यांना पक्षात घेऊन त्यांना पदे देण्याचा प्रयत्न  केला. त्यामुळे भाजपला आलेली सूजही बाहेरच्यांची आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मूळच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना बॅकफुटवर राहावे लागले आहे.  मात्र, आयात केलेले हे नेते ऐन निवडणुकीत लंगडा घोडा ठरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

आता दोन आमदारांना भाजपमध्ये घेऊन विधानसभा निवडणुकीत किमान एकतरी आमदार सातारा जिल्ह्यातून निवडून आणण्याचे स्वप्न भाजपचे नेते बघत आहेत. त्यात कितपत यश येणार, हे आगामी काळात दिसून येईल. पण, बाहेरच्या लोकांना पक्षात घेण्यासोबतच ज्यांच्या जिवावर भाजप जिल्ह्यात वाढला त्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांकडे लक्ष देणे, त्यांची ताकद वाढविणे अत्यावश्‍यक आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांसह सर्वांचेच त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी विविध महामंडळाच्या नियुक्‍त्या होणार आहेत. ती मूळ भाजपवाल्यांना ताकद देण्याची चांगली संधी आहे. सत्तेचा लाभ घेऊन दल बदलण्यात पटाईत असणारे, कोणत्याच रंगाची ॲलर्जी नसणारे, स्वत:च्या लाभासाठी पक्षाचा वापर करून घेणाऱ्यांना पदे दिल्यास भविष्यात पक्षाची हानी होऊ शकते, असे जुन्या कार्यकर्त्यांचे मत आहे. मुख्यमंत्री भाजपच्या कार्यकर्त्यांना ती संधी देतील, अशी आशा कार्यकर्त्यांना आहे.

आता काम मार्गी लावल्याचे सांगा!
मुख्यमंत्री ज्या ज्या वेळी साताऱ्यात आले, त्या त्या वेळी त्यांनी जिल्ह्यातील प्रमुख प्रलंबित प्रश्‍नांना हात घातला. प्रत्येक वेळी त्यांनी हे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले. आतापर्यंत चार दौऱ्यात जिल्ह्यातील जनतेला त्यांची आश्‍वासने पाठ झाली. आता पुन्हा दौऱ्यावर येताना एक तरी काम मार्गी लावले, हे सांगण्यासारखे त्यांच्याकडे काही तरी असावे, अशी अपेक्षा जिल्ह्यातील जनतेतून व्यक्त होत आहे. जिल्ह्याच्या विकासाची आश्‍वासने गाजर ठरू नयेत, असे सर्वसामान्यांचे म्हणणे आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com