कास भिंती व सांडवा परिसराची स्वच्छता

Kas-Cleaning-Campaign
Kas-Cleaning-Campaign

सातारा - यशोदा टेक्‍निकल कॅम्पसमधील विद्यार्थ्यांनी आज कास येथे श्रमदान करून भिंती व सांडवा परिसराची स्वच्छता केली. आजच्या श्रमदान मोहिमेत ३० पोती कचरा वेचण्यात आला, जो पाण्यात जाऊन प्रदूषण वाढण्याचा धोका होता. अभिनेते सयाजी शिंदे यांनी सकाळी लवकर कास तलावास भेट देऊन स्वच्छता अभियानाची माहिती घेत श्रमदानात सहभाग घेतला. श्री. शिंदे यांच्या उपस्थितीमुळे श्रमदान करणाऱ्या युवक-युवतींचा हुरूप वाढला. 

कास तलावाच्या भिंतीवर बसून निसर्गाचा आनंद घेताना त्याठिकाणी कचरा टाकून जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. खाद्यपदार्थांची वेस्टने, पाण्याच्या व दारूच्या रिकाम्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे, चॉकलेटचे कागद, लहान मुलांनी वापरलेले सॅनिटरीपॅड आदी कचरा कासच्या भिंतीजवळ आढळून आला. हा कचरा वाऱ्याने अथवा पावसाळी पाण्याने तलावात जाऊन पाणी प्रदूषणात वाढच होणार होती. कासच्या सुरवातीच्या १०० मीटर अंतराच्या पाटातही अशा पद्धतीचा कचरा पडलेला आढळला. श्रमदानात सहभागी कार्यकर्त्यांनी सर्व कचरा वेचून नेला. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास श्रमदान सुरू झाले. दहा वाजता आजच्या मोहिमेची सांगता झाली. 

अभिनेते सयाजी शिंदे आज साताऱ्यात होते. ‘सकाळ’च्या पुढाकाराने कासमध्ये श्रमदानातून स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आल्याचे समजल्यानंतर सकाळी लवकर ते कास येथे पोचले. ‘सकाळ’चे सहयोगी संपादक श्रीकांत कात्रे यांनी त्यांना मोहिमेची माहिती दिली. आजच्या श्रमदान मोहिमेत यशोदा टेक्‍निकल कॅम्पसचे प्रा. सुदीन कोळमकर, प्रा. दीपक शिंदे व त्यांच्या ३० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. शिवाय संकेत घाडगे, महेश नलवडे, मंगळवार पेठेतील बापूसाहेब चिपळूणकर मराठी शाळेतील शिक्षक संतोष बामणे यांनी भाग घेतला.

समन्वयक म्हणून डॉ. दीपक निकम, विशाल देशपांडे, सुधीर सुकाळे, निखिल वाघ यांनी काम पाहिले.

दर रविवारी कासला स्वच्छता करूया! - शिंदे
सयाजी शिंदे म्हणाले, ‘‘कासला जागतिक निसर्ग वारसास्थळाचा दर्जा आहे. जगात कोठे नाही अशी निसर्ग संपन्नता कासला आहे. प्लॅस्टिक बाटल्या व निसर्गाला मारक अन्य वस्तू याठिकाणी पडतात. त्या नष्ट व्हायला हव्यात. कासचा निसर्ग आपल्यालाच सांभाळायला हवा. लोकांमध्ये जागरुकता तयार होत आहे, त्यासाठी ‘सकाळ’ व त्यांचे सहकारी झटत आहेत. आपण सगळे जागरुक राहूयात आणि दर रविवारी कासला जाऊन कास स्वच्छ करूया.’’

सयाजी शिंदे यांनी कास स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्यानंतर नागरिकांशी संवाद साधल्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी https://www.facebook.com/SakalNews/ या लिंकवर क्‍लिक करा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com