शेकडोंनी घेरता आणि दहशत बिबट्याची म्हणता..! 

शेकडोंनी घेरता आणि दहशत बिबट्याची म्हणता..! 

‘‘जगण्याचा अधिकार निसर्गानं मलाही दिलाय. माझ्या लेकराबाळांना वाढवणे, त्यांना अन्न-पाणी, सुरक्षितता मिळवून देणे, हे माझे निसर्गदत्त कर्तव्य आहे. त्यासाठीची माझी धडपड हे सहज निसर्ग वर्तन असताना एवढ्या मोठ्या संख्येने लोक का माझ्या मागे लागत असतील? कोणाच्या मी आपणहून वाटेला गेलो नसताना दोन पायाच्यांनी का बरं माझ्या डोळ्यावर विजेरी मारावी? ४००-५०० च्या जमावाने घेऱ्यात घेतात काय, लाठ्या-काठ्या घेऊन मागे धावतात काय, गलका करून नुसते सळो की पळो करून सोडतात आणि मग चुकून एखाद्याला नख लागले तर परत बदनाम आमीच; म्हणे बिबट्याची दहशत!’’

अगदी ही नाही, परंतु काहीशी अशी मनोभावना शाहूपुरीत कालपासून मुक्कामी असलेल्या बिबट्याची झाली असावी. गेल्या २४ तासांत त्याने तिघांना पंजा मारून जखमी केले. विशेष म्हणजे जखमी झालेले तिघेही बघ्यांच्या गर्दीचा भाग होतो. सुमारे २०० मीटर परिघात, मानवी गराड्यात काल सायंकाळी पाच वाजल्यापासून तो बसून आहे. या मादी बिबट्यासोबत त्याच्या परिवारातील एखादा सदस्य असावा असा अंदाज आहे. वन्यजीव-मानव संघर्ष वाढत आहे. विशेषत: बिबट्या प्रवणक्षेत्रात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील कऱ्हाड, पाटण, जावळी, साताऱ्याबरोबर खंडाळा, फलटणसारखा भागही बिबट्या प्रवणक्षेत्रात गणला जाऊ लागला आहे. बिबट्या प्रवणक्षेत्र वाढत असताना अशा भागात बिबट्याच्या अनुषंगाने लोकजागृती मात्र वाढताना दिसत नाही, ही मोठी अडचण आहे. त्यामुळेच कदाचित लोक बिबट्या म्हटल्यानंतर लगेच ‘कुठाय’ म्हणतात. आणि वरून  पुन्हा ‘बिबट्याची दहशत’ म्हणून बिबट्यालाच बदनाम केले जाते. 

मानवी वसाहतीत बिबट्या शिरला की मानवी वर्तन कसे असावे, याबाबत लोकांमध्ये पुरेशी जागृती नाही. सरकारच्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये नैसर्गिक आपत्तीचाच विचार केला जातो. वन्यजीव लोकवस्तीत शिरल्यानंतर काय करावे, काय करू नये याबाबत लोकांना काहीच माहिती नसते. मग हवे तसेच लोक वागतात आणि त्यात एखाद्याच्या जिवावर बेतू शकते. बिबट्या प्रवणक्षेत्रामध्ये स्थानिक तरुणांची एक ‘टीम’ तयार असली पाहिजे. जमावाला आवरण्याचे काम या गटाकडे असले पाहिजे. त्यांनी बिबट्याला नव्हे तर जमावाला आवरले पाहिजे. बिबट्या प्रवणक्षेत्रामध्ये मानवी वर्तनासंदर्भात पुरेशी जागृती असली पाहिजे. हे काम वन विभागाच्या मदतीने युवकांच्या या गटाने करावे. बिबट्या लोकवस्तीत शिरल्यास हा गट लगेच कार्यरत होईल. त्यामुळे शाहूपुरीसारखे संभाव्य हल्ले टाळता येतील.

...हे करा
 शेतात काम करताना एकट्याने काम करू नये, जमावाने काम करावे
 रात्रीच्या वेळी गोठा सर्व बाजूंनी बंदिस्त राहील, याची काळजी घ्या
 बिबट्याचे वास्तव्य, घडणाऱ्या घटनेची माहिती तत्काळ वन विभागाला द्या
 वस्तीपासून शेतापर्यंत तसेच शालेय विद्यार्थ्यांचे येणे-जाणे जमावाने करावे 
 मोठ्या माणसांनी हातात प्रतिबंधक उपाय म्हणून काठी-बॅटरी बाळगा

...हे करू नका
 संध्याकाळच्या वेळेस अंगणात, परिसरात 
मुलांना एकटे खेळू देऊ नये
 संध्याकाळी सहा ते नऊ या वेळात जास्त 
खबरदारी घ्या
 बिबट्या दिसल्यास छायाचित्रणाचा आततायी प्रयत्न नको
 गुराख्यांनी गावापासून दूर तसेच वनाच्या खूप जवळ गुरेचराईस जाणे 
 बिबट्या दिसल्यास जमावाने त्याच्या मागे, जवळ जाणे, गोंगाट, दगड-काठी मारणे, डिवचणे टाळावे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com