पेट्रोल चोरटे सीसीटीव्हीच्या नजरेत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

सातारा - पार्किंगमधील वाहनांतून मध्यरात्री पेट्रोल चोरीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिक त्रस्त आहेत. याबाबतचे वृत्त नऊ जानेवारीच्या अंकात "सकाळ'ने प्रकाशित केले होते. त्यात पार्किंगमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर पेट्रोल चोरट्यांचे एक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियाच्या माध्यमातून "सकाळ'कडे उपलब्ध झाले आहे. अशा चोरट्यांच्या मुसक्‍या आवळण्याचे आव्हान सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांपुढे आहे. 

गंभीर स्वरूपाचे गुन्हे, त्यांचा तपास, बंदोबस्त, प्रशासकीय बाबी आदींमुळे पोलिस यंत्रणा मेटाकुटीस आली आहे. या यंत्रणेवर कामाचा ताण अधिक असला तरी कोणत्याही गुन्ह्याकडे किरकोळ म्हणून दुर्लक्षित करून चालणार नाही. सध्या पेट्रोल चोरीच्या गुन्ह्यांकडे काहीसे असेच पाहिले जात आहे. शहर व परिसरातील वाढत्या सोनसाखळी चोऱ्यांच्या प्रकारांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले. या गुन्ह्यांना अटकाव करण्यात पोलिसांना बऱ्यापैकी यशही आले. त्यासाठी येथील पोलिस अभिनंदनास पात्रच आहेत. सोनसाखळी हिसकावण्याचे प्रकार घटले असतानाच सातारा शहरात मोटारसायलकमधील पेट्रोल, किमती सायकली, गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरी अशा भुरट्या चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. 

अशा गुन्ह्यांसंदर्भात ता. नऊ जानेवारीच्या अंकात "सकाळ'ने प्रकाश टाकला होता. त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. शनिवार पेठेतील बालविकास गणेशोत्सव मंडळानजीक "शांती प्लाझा' अपार्टमेंटमध्ये ता. 27 जानेवारीस पेट्रोल चोरीचा प्रकार घडला. मध्यरात्री अडीच ते तीन दरम्यान सुरू असलेल्या या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज दै. "सकाळ'कडे उपलब्ध झाले आहे. या गुन्ह्यात दोन युवकांचा सहभाग दिसत असून एक युवक पार्किंगमधील विजेचे दिवे बंद करताना दिसत आहे. त्यानंतर बाटल्यांमध्ये पेट्रोल भरून घेतानाचे चित्रीकरण झाले आहे. कामधंदा नसलेले, चुकीच्या नादाला लागलेले युवक अशा प्रकारांमध्ये सहभागी असल्याची माहिती पुढे येत आहे. शनिवार पेठेतील चोरीतील संशयित स्पष्ट दिसत आहेत. पोलिस या फुटेजच्या माध्यमातून चोरट्या युवकांपर्यंत पोचणार का? असा प्रश्‍न आहे. 

युवक ताब्यात... सायकलचोर फरार! 
काही दिवसांपूर्वी छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलातून सायकल चोरीस गेली. व्यायामास येणाऱ्यांचे मोबाईल, दप्तर आदी साहित्यांचीही चोरी झाली. जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाने या संदर्भात पोलिसांना कळवून सीसीटीव्हीचे फुटेजही सुपूर्द केले. या चोरीच्या प्रकारानंतर जिल्हा क्रीडाधिकारी सुहास पाटील यांनी सतर्क राहून खेळाडूंच्या साथीने एका युवकास पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. परंतु, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारे सायकल चोर अद्याप सापडले नसल्याची माहिती तक्रारदारांनी दिली. 

Web Title: marathi news satara news petrol theft CCTV camera