पवार, फडणवीसांच्या जुगलबंदीचे औत्सुक्‍य

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

सातारा - खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस (ता. २४ फेब्रुवारी) साताऱ्यात दणक्‍यात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी विविध पक्षांच्या नेत्यांना निमंत्रणे दिली आहेत. सातारा शहरातही उदयनराजे समर्थकांनी कार्यक्रमासाठी वातावरणनिर्मिती केली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तापलेल्या राजकीय वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील जुगलबंदी औत्सुक्‍याची ठरणार आहे.  

सातारा - खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस (ता. २४ फेब्रुवारी) साताऱ्यात दणक्‍यात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी विविध पक्षांच्या नेत्यांना निमंत्रणे दिली आहेत. सातारा शहरातही उदयनराजे समर्थकांनी कार्यक्रमासाठी वातावरणनिर्मिती केली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तापलेल्या राजकीय वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील जुगलबंदी औत्सुक्‍याची ठरणार आहे.  

खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस शनिवारी (ता. २४) आहे. त्या निमित्ताने भरगच्च शासकीय आणि राजकीय कार्यक्रमांची रेलचेल आहे. त्यासाठी राज्यातील दिग्गज नेत्यांना निमंत्रणेही धाडण्यात आली आहेत. विविध मंत्री व नेत्यांच्या दौऱ्याचे नियोजनही खासदार समर्थक करत आहेत. विविध विकासकामांची भूमिपूजने आणि जिल्हा परिषदेच्या मैदानावर सायंकाळी सहा वाजता होणारा सत्कार व जाहीर सभेत नेत्यांची भाषणे ऐकणे सर्वांसाठी पर्वणी ठरणार आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे एकाच व्यासपीठावर येत आहे. हे दोघेही कार्यक्रमास उपस्थित राहिल्यास ते उदयनराजेंविषयी आणि सातारा लोकसभा मतदारसंघाविषयी नेमके काय बोलणार याची सर्वांमध्ये उत्सुकता आहे. यासोबतच राष्ट्रवादीचे आमदार व जिल्ह्यातील पक्षाचे नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का, यावरही कार्यक्रमाची ताकद समजणार आहे. सध्या तरी उदयनराजे व त्यांच्या समर्थकांनी मागील काही वर्षांत मने दुखावलेल्या राष्ट्रवादीतील नेत्यांशी संपर्क करून त्यांना या कार्यक्रमाला येण्याचे निमंत्रण देत आहेत. सर्व पक्षीय दिग्गज नेते वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर आणण्याचे उदयनराजेंचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण करण्याचा प्रयत्न सर्व जण करताना दिसतात. त्यातून ‘जनता हाच आमचा पक्ष’ हे उदयनराजेंचे मत सार्थ करण्याचा प्रयत्न होताना दिसतो. वाढदिवसाच्या कार्यक्रमातून उदयनराजे लोकसभेची पेरणी करणार, हे निश्‍चित असले तरी प्रत्यक्ष नेत्यांची उपस्थितीवर सर्व काही अवलंबून आहे. आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सध्या राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यातच खासदार उदयनराजेंचा सर्वपक्षीय नेत्यांना वाढदिवसानिमित्त एका व्यासपीठावर आणून ताकद दाखविण्याचा हा प्रयत्न आहे. या प्रयत्नात राष्ट्रवादीच्या नेत्यांची साथ त्यांना मिळणार का, याची उत्सुकता आहे.

शिवेंद्रसिंहराजे भोसलेंच्या उपस्थितीबाबत उत्सुकता
खासदारांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित राहणार का, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. पालिका निवडणुकीपासून या दोघांत बिनसले आहे. त्यातच आनेवाडी टोलनाक्‍यावरून झालेल्या वादामुळे दोघांतील दरी वाढत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही दरी कमी करण्याचा प्रयत्न होणार आहे; पण त्यास शिवेंद्रसिंहराजे मान्यता देणार का, हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. 

Web Title: marathi news satara news Udayanraje Bhosale sharad pawar devendra fadnavis