"प्लॅन बी'सह उदयनराजेंचा "राष्ट्रवाद' जोमात! 

"प्लॅन बी'सह उदयनराजेंचा "राष्ट्रवाद' जोमात! 

सातारा - "मैं खडा तो सरकारसे भी बडा' हे खासदार उदयनराजे भोसले यांच्या चाहत्यांचे सर्वांत आवडते घोषवाक्‍य. त्याला साजेशीच पावले टाकत उदयनराजे आजवर आपली राजकीय वाटचाल करत आले आहेत. सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या त्यांच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमातूनही आगामी लोकसभेला माझ्याशिवाय पर्याय नाही आणि माझ्याकडे पर्यायही आहेत, हे दाखविणारी त्यांची मुत्सद्देगिरी संपूर्ण राज्याला दिसणार का, हे पाहावे लागेल. आपला "प्लॅन बी' तयार असल्याचे भासवत आगामी लोकसभेची बांधणी करण्याची योग्य वेळ त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने साधली, हे मात्र नक्की. 

खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राजकीय कारकिर्दीच्या सुरवातीलाच उदयनराजेंना नगराध्यक्ष व खासदारकीच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी जिल्ह्याच्या राजकारणात त्यांना सक्षम पर्याय उरणार नाही, अशी परिस्थिती पुढे येईल असे कोणालाही वाटले नसेल. मात्र, उदयनराजेंनी आज ते साध्य केले आहे. कार्यकर्ता व जनतेमध्ये त्यांनी नेता म्हणून स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांच्या पाठीमागे उभे राहणारी सर्वच स्तरातील, वयोगटातील लोकांची फळी निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. उदयनराजे राजकारणी नाहीत, त्यांचे काय ते थेट असते, असे सर्वजण म्हणतात. किंबहुना सर्वांना तसे वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण करण्यात उदयनराजे यशस्वी झालेत. मात्र, त्यांच्यात एक धुरंदर राजकारणी उपजतच असल्याचे त्यांच्या अनेक यशस्वी खेळ्यांनी सिद्ध करून दाखविले आहे. 

जिल्ह्यामध्ये एकहाती सत्ता असणाऱ्या राष्ट्रवादीकडे अनेक मोठी नावे आहेत. त्यांचे स्वत:चे असे भक्कम मतदारसंघ आहेत. स्थानिक नेतृत्वाला विरोध असला, तरी पक्षाला मानणारे मतदार जिल्ह्यात कमी नाहीत. अशा या राष्ट्रवादीच्या गडात उदयनराजेंनी मुसंडी मारली. सर्व काही आपल्यातच, कोणाकडे काय हे ठरलेल्या जिल्हा राष्ट्रवादीत तेव्हापासून तशी खळबळ उडाली होती. ती आताही आहेच. मात्र, भूमाता दिंडीच्या माध्यमातून आणि अन्य पक्षीयांची यशस्वी मोट बांधून उदयनराजेंनी दबाव निर्माण केला. त्याच माध्यमातून त्यांनी पहिल्यांदा खासदारकीचे तिकीट मिळविले. 

चार वर्षे आपल्या कार्यकर्त्यांची आणि अन्य पक्षीयांची आणि एक वर्ष राष्ट्रवादीचे, अशी कृती नेहमीच त्यांच्याकडून (जाणीवपूर्वक) घडत असते. राज्यपातळीवरील नेतृत्वावर टीका हाही त्याचाच एक भाग. त्यातून पक्षांतर्गत विरोधकांना संधी मिळाली. त्यामुळेच मागील निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचा जिल्ह्यातील सात-बारा आपलाच समजणाऱ्यांनी त्यांच्या विरोधात रान उठविले. तालुका पातळीवरील पक्षाच्या बैठकांत विरोधाचे ठराव झाले. मात्र, अशा भूमिकेमुळे उदयनराजे विरोधकांना नेहमीच आपलेसे वाटत राहिले. त्यामुळे संभाजी भिंडेंच्या माध्यमातून रायगडावरील मोदींच्या कार्यक्रमाचे नियोजन उदयनराजेंकडे आले. देशभरात मोदींची लाट होती. त्यामुळे कोणताही नेता भाजपच्या प्रेमात पडला असता. पण, उदयनराजेंची मुत्सद्देगिरी त्याला तयार झाली नाही. सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, हे ते चांगलेच जाणून होते आणि आहेत. राष्ट्रवादीने डावलले, तर भाजपमध्ये जाण्याचे आणि राष्ट्रवादीला सोडून भाजपमध्ये जाण्याचे परिणाम काय होऊ शकतात, हे त्यांनी जाणले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवारही ते जाणतात. त्यामुळे सर्व लाडक्‍या नेत्यांचा हट्ट त्यांनी डावलला. 

आताही परिस्थिती वेगळी नाही. सातारा पालिका निवडणूक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जिव्हारी लागली होती. त्या निवडणुकीत "साताऱ्याचा पुढचा आमदार सर्वसामान्य माणूसच,' हा त्या वेळच्या परिस्थितीत अत्यावश्‍यक असलेला राजकीय पवित्रा उदयनराजेंनी घेतला होता. त्याचे पडसादही लोकसभा निवडणुकीत दिसणारच. सभापती रामराजे नाईक-निंबाळकरांचे उदयनराजेंशी सख्य जिल्ह्याला माहीत झाले आहे. ते संधींच्याच शोधात असतात. इतर राष्ट्रवादीकरांची मने वळविणे या जोडीला जड नाही. त्यामुळे आगामी लोकसभेची बांधणी करण्याची योग्य वेळ वाढदिवसाच्या निमित्ताने उदयनराजेंनी साधली आहे. 

शिवेंद्रसिंहराजे व रामराजे यांच्या पवित्र्यावर अजित पवार हेच रामबाण उपाय ठरू शकतात. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवारांशी असलेला दुरावा आता दूर केलाच पाहिजे, हे उदयनराजेंनी जाणले. त्यातून अजित पवारांना आवतण धाडले गेले. राष्ट्रवादीला दाबात ठेवायचे असेल, तर भाजपशी संधान आवश्‍यक आहे. तो उदयनराजेंचा "प्लॅन बी' आहे. त्यातून मुख्यमंत्र्यांना आमंत्रण गेले आहे. भाजपच्या धुरिणांनाही उदयनराजेंच्या वाढलेल्या ताकदीची जाणीव आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात उदयनराजेंशिवाय कमळ फुलवू शकत नाही, असे भाजपमधील काहींचे मत आहे. मराठा मोर्चा व मराठा आरक्षणाचा मुद्दा आगामी निवडणुकीत भाजपसाठी कळीचा ठरणार आहे. त्यामुळे त्यांनाही उदयनराजेंची गरज आहे. दोन्ही पक्षाला ती वाटावी, हीच उदयनराजेंची मुत्सद्देगिरी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com