शरद पवार यांची भूमिका औत्सुक्‍याची 

शरद पवार यांची भूमिका औत्सुक्‍याची 

सातारा - राष्ट्रवादी कॉंग्रसेच्या आमदारांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहून काल केलेले एक प्रकारचे बंड जसे उदयनराजेंच्या हिताचे नाही, तसेच पक्षाच्याही नाही. कालच्या प्रकाराने जिल्ह्यात कुठेच नसणाऱ्या विरोधकांना आयते कोलीत मिळणार आहे. काही आडाखे आखूनच राष्ट्रवादीच्या आमदारांनी कालचा पवित्रा घेतला असणार, हेही नक्की. आगामी समीकरणे बदलवण्यासाठीचा हा एक प्रयत्न असू शकतो. तशी ती बदलणार किंवा नाही, हे पुढील काळात कळेल. आगामी निवडणुकांना सामोरे जाताना पक्षाध्यक्ष शरद पवार काय भूमिका घेणार, हे पाहणेही औत्सुक्‍याचे ठरेल. 

उदयनराजे व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचे खऱ्या अर्थाने मनोमीलन कधीच नव्हते. मुळात उदयनराजे पक्षात यावेत, अशी बहुतांश राष्ट्रवादीकरांची इच्छा नव्हती. त्यांची काम करण्याची स्वतंत्र पद्धत याला कारणीभूत आहे. कोणा एका माळेचा मणी बनणे त्यांनी कधीच पसंत केलेले नाही. असे असतानाही भाजप, कॉंग्रेस अशी वारी करत उदयनराजे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आले. भूमाता दिंडीच्या माध्यमातून उदयनराजेंनी निर्माण केलेल्या दबावाने त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश सुखकर झाला, असे म्हटले जाते. मात्र, ते तितकेसे खरे नाही. मतदारसंघ पुनर्रचना हे त्यामागचे खरे कारण आहे. 

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर आमदार पहिल्यांदाच निवडणुकांना सामोरे जाणार होते. सातारा-जावळी एक झाल्याने शशिकांत शिंदेंना कोरेगावात जावे लागणार होते, त्यात सातारा व खटावमधील निर्णायक मतदानही होते, कऱ्हाड उत्तरमध्ये सातारा, खटाव तालुक्‍यांतील भाग समाविष्ट झाला होता. पाटणमध्ये कऱ्हाड दक्षिणमधील गट आले होते. उत्तरमध्ये असलेली कऱ्हाड पालिका दक्षिणेत गेली होती. वाई मतदारसंघात महाबळेश्‍वर व खंडाळा तालुके समविष्ट झाले होते. दोन-तीन आमदार कमी झाले होते, तर लोकसभेचा एक मतदारसंघ वाढला होता. सातारा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात उदयनराजेंचा काही ना काही गट होता. कॉंग्रेस, भाजप, आरपीआय, शिवसेना यांचे कार्यकर्तेही उदयनराजेंनाच नेता मानत होते. अशा परिस्थितीत नव्या मैदानावर पहिल्याच लढतीत कोणाही आमदाराला धोका पत्कारायचा नव्हता. साताऱ्यातही मनोमीलन होते. त्यामुळे आमदार बाळासाहेब पाटील यांना पक्षाची उमेदवारी मिळत नसतानाही कोणी उदयनराजेंना विरोध करण्यासाठी एकत्र आले नाही. स्वत:ची सुरक्षितता हा एकच विचार त्यामागे होता. शरद पवारांची इच्छा नसतानाही उदयनराजेंना खासदारकीचे तिकीट द्यावे लागले. 

दहा वर्षांनंतर उदयनराजेंच्या तेव्हाच्या कृतीत आणि वागण्यात फारसा बदल झालेला नसताना आता उदयनराजेंविरोधात सर्व आमदारांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे. तसा तो अंतर्गत का होईना 2014 मध्येही घेतला होता. पण, साताऱ्यात कुरबुरी असल्या तरी, मनोमीलन टिकून होते. एकट्या रामराजेंचा प्रखर विरोध सर्व आमदारांना उदयनराजेंच्या विरोधात उभे करू शकला नाही. आता परिस्थिती बदलली आहे. पुनर्रचनेनंतरच्या मतदारसंघांना आमदार सरावले आहेत. नव्या समाविष्ट झालेल्या गावांत ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे उदयनराजेंची त्यांना तितकीशी धास्ती वाटत नाही. मात्र, शिवेंद्रसिंहराजेंची वाटावी अशी परिस्थिती आहे. कोरेगाव व कऱ्हाड उत्तरमध्ये त्यांच्या नाराजीचा थेट परिणाम पडू शकतो. रामराजेही काही मतदारसंघांत परिणाम घडवू शकतात. या जोडीच्या भक्कम विरोधामुळे मनात असूनही काहींना उदयनराजेंच्या व्यासपीठावर येता आले नाही. त्यामुळेच पक्षाध्यक्षांच्या उपस्थितीत बंड यशस्वी झाले. 

उदयनराजेंनीही काही कमी कलागती केलेल्या नाहीत. शिवाजी शिंदेंच्या बंडाला साथ देत जिल्हा परिषदेमध्ये पक्षाची मान खाली जाण्याच्या कृतीत मदत केली. पक्षाचे संख्याबळ जास्त असतानाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवाराला ताकद दिली. या दोन्ही घटना पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला आव्हान देणाऱ्या होत्या. कऱ्हाड व वाई पालिकेत पक्षविरोधी उमेदवारांना बळ दिले. त्यांच्या कृतीतून प्रत्येक वेळी राष्ट्रवादीचे नेतृत्व, आमदार, पदाधिकारी यांना शह देण्याचा प्रयत्न झाला. तर, दुसरीकडे विरोधी गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांना उदयनराजेंनी जिल्हा पातळीवर, गावपातळीवर बळ दिले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येही उदयनराजेंविषयी नाराजी आहेच. त्यामुळे आमदारांचे बंडही विनाकारण आहे, हे म्हणता येणार नाही. मात्र, स्वत:चा हात दगडाखालून निसटल्यावर पक्षाला अडचणीत आणण्याचे कामही त्यांच्याकडून होणे अपेक्षित नाही. 

देशात व राज्यात भाजपने मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्यांचा पाडाव करणे तितकेसे सोपे नाही. अशा परिस्थितीत सर्व विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न पक्षाध्यक्ष शरद पवार करत आहेत. बाहेरच्या जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांत पक्षाला खूप काम करावे लागणार आहे. अनेकांची सांगड घालावी लागणार आहे. त्यासाठी बराच वेळ व श्रम खर्च होणार आहेत. बालेकिल्ल्यातील मातब्बर आमदारांची पक्षाला त्यासाठी आगामी निवडणुकीत गरज पडणार आहे. उदयनराजेंना अंगावर घेऊन त्यांनी साताऱ्यातच अडकून पडणे पक्षाच्या हिताचे नाही. विरोधक तेवढ्यावरच टपले आहेत. त्यामुळे बंड मिटवते घेणेच सर्वांच्या हिताचे असणार आहे. सर्व आमदारांनी एकत्रित ठरवलेच तर, खासदार उदयनराजेंनाही निवडणूक वाटते तेवढी सोपी जाणार नाही. पराभवही स्वीकारावा लागू शकतो. त्यामुळे त्यांनीही आपली भूमिका सर्वांशी मिळतीजुळती घेणे, त्या-त्या मतदारसंघात संबंधित आमदाराच्या विचाराने काम करणे अत्यावश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com