समाजकल्याण आयुक्तालयाचा गोंधळ 

notice
notice

सोलापूर - शिष्यवृत्तीपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये व होणारी लूट थांबावी म्हणून सरकारच्या समाजकल्याण आयुक्तालयाने 2017-18 या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन अर्ज भरून घेतले. मात्र आता परीक्षेच्या तोंडावर नव्याने ऑफलाइन अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे. याबाबत शहरातील प्रमुख महाविद्यालयांनी फलकांवर तशा सूचना लावण्यात आल्या आहेत. "महाडीबीटी'वर ऑनलाइन भरलेले अर्ज रद्द झाले असल्याचे यात म्हटले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला असून, अनेकजण शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

राज्य सरकारने सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तींसाठी https://mahadbt.gov.in  (महाडीबीटी) हे संकेतस्थळ विकसित केले आहे. सामाजिक न्याय विभागाची शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क, विद्यावेतन, निर्वाह भत्ता आदी योजनांचा यामध्ये समावेश केला. त्यानुसार संबंधित विद्यार्थ्यांनी खर्च करून संकेतस्थळावर अर्ज भरले. शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यावर आणि शिक्षण फी व इतर शुल्काची रक्कम विद्यार्थी ज्या महाविद्यालयात शिकतो त्या महाविद्यालयाच्या खात्यावर जमा केली जात होती. परंतु आता सर्व रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. त्यानुसार सर्व प्रक्रिया ही महाडीबीटी पोर्टलवर करणे सक्तीचे केले होते. भारत सरकार मॅट्रिकेतर शिष्यवृत्ती, राज्य सरकारची शिक्षण फी, परीक्षा शुल्क, प्रतिपूर्ती शुल्क आदींचा यात समावेश आहे. 

बारावीच्या विद्यार्थ्यांचे काय..? 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बुधवारपासून (ता. 21) बारावीची परीक्षा सुरू होत आहे. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासात आहेत. सरकारच्या ऑफलाइन फतव्याची त्यांना माहितीही नाही. त्यामुळे त्यांनी अर्ज कसे करायचे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

आर्थिक भुर्दंड 
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अगोदर खर्च करावा लागला. बेकायदेशीररीत्या 200-300 रुपये घेतले जात होते. शिष्यवृत्ती मिळणार एक हजार 200 रुपये अन्‌ खर्च 400-500 रुपये होत आहे. 

पोर्टलवर ऑनलाइनचेच आवाहन... 
महाविद्यालयांमध्ये ऑफलाइन अर्ज करण्याचे आवाहन केले असले तरी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळावर मात्र "महाडीबीटी'वर अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. "अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवण्यासाठी महाडीबीटी या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आवाहन', असे यामध्ये म्हटले आहे. 

संबंधितांचा संपर्क नाही 
महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीबाबत लावलेल्या सूचनांची चौकशी करण्यासाठी समाजकल्याण विभागात संपर्क साधला; परंतु संपर्क होऊ शकला नाही. साहेब जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला गेले असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, संपर्क क्रमांकही देण्यात आला नाही. 

''परीक्षांच्या तोंडावर शिष्यवृत्तीचे ऑफलाइन अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे. दिलेल्या मुदतीत अर्ज भरणे विद्यार्थ्यांना शक्‍य होणार नाही. यातून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे. पुण्यालाही याबाबत पत्रव्यवहार करणार आहे''.
गणेश डोंगरे, जिल्हाध्यक्ष, एनएसयुआय, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com