शेतमजूराने जोपासला 1860 पासुनच्या देश-विदेशातील पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह

वसंत कांबळे 
शुक्रवार, 9 मार्च 2018

माढा तालुक्यातील लऊळ सारख्या ग्रामीण भागातील एका शेतमजुराने देशी-विदेशी पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह करुन तो जोपासला असून तो नाविन्यपूर्ण व कौतुकास्पद आहे.

कुर्डु (सोलापूर) - छंद म्हणजे स्वत:ची लय. छंद म्हणजे स्वत:चा शोध. छंद म्हणजे स्वत:चा आणि इतरांचाही आनंद. खरंच, आपल्या आवडीनिवडींना, आंतरीक ऊर्मींना आयुष्यात जागा द्यायलाच हवी. आयुष्यात एक तरी छंद जोपासावा, कारण तीच आपली खरी ओळख असते. त्यातूनच आपल्याला खरंखुरं समाधान मिळत असतं, असाच छंद माढा तालुक्यातील लऊळ सारख्या ग्रामीण भागातील एका शेतमजुराने देशी-विदेशी पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह करुन तो जोपासला असून तो नाविन्यपूर्ण व कौतुकास्पद आहे.

महादेव डांगे यांची लऊळ येथे 22 गुंठे शेती आहे. घरची हलाखीची परिस्थिती असल्याने शाळकरी वयापासून मजुरीची सवय असलेले महादेव यांना चौथीमध्ये शिकत असताना पोस्टाच्या तिकिटाचे महत्व एका प्रसंगावरून समजले आणि तेव्हापासून त्यांना ही तिकिटे संग्रह करण्याचा नादच लागला. गेली 40 वर्षे महादेव यांनी हा छंद जपला आह, तर या तिकिटांच्या बदल्यात मोठ्या रकमेचे आमिष दाखवले तरी आपल्या जोपासलेल्या छंदा पुढे परिस्थिती हलाखीची असताना ही त्या आमिषाला बळी पडले नाहीत. 

महादेव डांगे यांचे शेतातील झोपडी मध्ये वास्तव्य असुन त्यांना कुटुंबाचा गाडा चालवणे अवघड होत असल्याने मुलगा विजय आणि महादेव हे दोघेही मजुरीचे काम करतात. महादेव हे चौथीमध्ये असताना त्यांना एक पोस्टाचे जुने तिकीट मिळाले होते. हे तिकीट त्यांच्याकडून एकाने दीड रुपयाला विकत घेतले आणि ही तिकिटं खूपच मौल्यवान असतात, याचा महादेव यांना साक्षात्कार झाला. शालेय वयातच महादेव यांनी तिकिटं गोळा करण्यास सुरुवात केली. तरुणपणी कामासाठी महादेव पुण्यात स्थलांतरित झाले. इथे काम करताना अशी पुरातन तिकिटांच्या शोधात असे. पेंटिंगचे काम करता करता पुणे आणि परिसरात लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवत त्यांच्याकडून मजुरी कमी मिळाली तरी घ्यायची, मात्र त्यांच्याकडे असलेल्या जुन्या पाकिटांवरील तिकिटे मात्र ते न लाजता मागून घेत.

post tickets

महादेव यांची ही आवड पाहून पुण्यातील कॅम्प परिसरात काम करताना, त्यांना अनेक विदेशी तिकिटे मिळाली. महादेव यांची आवड पाहून पुण्यातील एका निवृत्त अधिकाऱ्याने त्यांच्याजवळील काही जुनी तिकिटांचा संग्रह दिल्यावर आभाळाला गवसणी घातल्याचा आनंद महादेव यांना झाला. व भारत, पाकिस्तान, इंग्लंड, फ्रांस, आफिका अशा अनेक देशातील पुरातन तिकिटांचा संग्रह तयार झाला. आज महादेव यांनी वयाची पन्नाशी गाठली आहे. गेली 40 वर्षे जपलेला आपला हा संग्रह शाळेतील विद्यार्थ्यांनी पाहावा याची माहिती घ्यावी हा त्यांचा उद्देश होता. आता ते पुन्हा आपल्या लऊळ या गावी येऊन पुन्हा आपल्या भागात मजुरी करू लागले आहेत.

आता त्यांचा मुलगाही मजुरीला जातो, पण हे तिकिटांच्या संग्रहाचे त्यांचे वेड आजही तसेच आहे. आजही महादेव आणि त्यांच्या पत्नीने हा संग्रह झोपडीतील एका पेटाऱ्यात जपून ठेवला आहे. महादेव याचेकडे 1860 सालापासून ची दुर्मिळ पोस्ट तिकीटे आहेत. भारत, पाकिस्तान, इंग्लंड, फ्रांन्स, दक्षिण अफ्रिका, चीन यासह  अन्य देशातील पुरातन तिकिटांचा संग्रह त्याच्याकडे आहे. आपला संग्रह ग्रामीण भागातील मुलांनी पाहावा आणि त्यातून माहिती घ्यावी ही त्यांची इच्छा असली तरी आजच्या मोबाईलच्या जमान्यात महादेव यांच्या तिकिटांचा संग्रह या मुलांसाठी आजही आऊट ऑफ कव्हरेज आहे.

काही वर्षांपूर्वी त्याच्याकडील तिकिटांचा संग्रहाची माहिती घेऊन कोलकात्याच्या एका डॉक्टरने फोन करून सर्व तिकिटांचा संग्रह दोन कोटी रुपयांना मागितला होता. हातावर पोट असणाऱ्या कोणालाही ही रक्कम फारच मोठी असते, मात्र तरीही महादेव यांनी आपली जपलेली आवड विकण्यास नकार दिला.

post tickets
 

Web Title: marathi news solapur farmer Indian foreign post tickets collection