नितीन करतोय ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास!

Solapur
Solapur

सोलापूर : व्यवसायाने सराफ असणाऱ्या नितीन अणवेकर या तरुणाने ऐतिहासिक वास्तूंना भेटी देऊन वास्तूकलेचा अभ्यास करण्याचा आगळावेगळा छंद जोपासला आहे. सोलापूरच्या भुईकोट किल्ल्याचे मार्केटिंग करत त्यांनी आजवर हजारो लोकांना भ्रमंती घडविली आहे. आपल्याकडे असलेली माहिती इतरांना देण्यासाठी उत्सुक असलेला हा तरुण खरंच स्मार्ट सोलापूरकर आहे. 

वडिलोपार्जित सराफी व्यवसाय सांभाळताना नितीन यांना इतिहासाची पुस्तके वाचण्याची आवड लागली. त्यातूनच पुढे सोलापूरचे ज्येष्ठ संशोधक आनंद कुंभार यांची भेट झाली. कुंभार यांनी नितीनच्या जिज्ञासेचे कौतुक करून ऐतिहासिक वास्तू, शिल्पांचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन दिले. सात वर्षांपासून त्यांनी ऐतिहासिक वास्तूंना भेटी देऊन नोंदी घेतल्या आहेत. सराफ बाजाराला सोमवारी सुटी असते. सुटीच्या दिवशी ते सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यात किंवा एखाद्या ऐतिहासिक वास्तूच्या भेटीवर असतात. या भटकंतीत शक्‍य तेव्हा मित्र विजय जाधव, गणेश दरक, स्वप्नील वेर्णेकर, संभ्रम अणवेकर, बसवराज जमखंडी हे सोबत देत आहेत. 

नितीन यांनी "भुईकोट सोलापूरचा' हे पुस्तकही लिहिले आहे. त्याची दुसरी आवृत्तीही लवकरच येणार आहे. भुईकोट किल्ल्यातील आदिलशाही कालीन शिलालेख त्यांनी समोर आणला. मोडी व देवनागरी मिश्रित भाषेत असणारा हा शिलालेख आजपर्यंत दुर्लक्षित होता. गेल्या महिन्यात छत्रपती संभाजी महाराज यांनी भुईकोट किल्ल्यास भेट दिली. नितीन यांनी महाराजांना किल्ल्यांची इत्थंभूत माहिती देऊन संवर्धनासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली. गेल्या आठवड्यात त्यांनी परांडा किल्ल्यास भेट दिली आहे. किल्ल्यात विविध बुरुजांवर विविध आकाराच्या तोफा आहेत. त्यापैकी काही तोफा अत्यंत महत्त्वाच्या असल्याचा उल्लेख त्यांनी सोशल मीडियावर केला आहे. आपला इतिहास नव्या पिढीला समजावा यासाठी प्रयत्न करत असल्याचे नितीन यांनी सांगितले. 

भटकंतीत हे पाहायचे..
जुने मंदिर, मशीद, कबर, समाधी, स्मारक, मूर्ती, शिल्प, जुने वाडे, दरवाजे, बारव, किल्ले, विरघळ, वेस, विहिरी, संग्रहालय. 

ज्येष्ठ संशोधक आनंद कुंभार यांच्या प्रेरणेने ऐतिहासिक वास्तूंच्या अभ्यासकांचा छंद जोपासला. आजवर विविध ठिकाणी भेटी देऊन नोंदी घेतल्या आहेत. सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यात पाहण्यासारखे काहीच नाही असे म्हणून सर्वांनी दुर्लक्ष केले, पण आपला भुईकोट किल्ला वैशिष्ट्यपूर्ण आहे. आजवर हजारो लोकांना भुईकोट किल्ल्याची माहिती दिल्याचे समाधान आहे. 
- नितीन अणवेकर,  ऐतिहासिक वास्तू अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com