सांगोला-पंढरपूर महामार्गाच्या भुसंपादनास शेतकऱ्यांचा विरोध

road work
road work

संगेवाडी : सांगोला ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार या डांबरी रस्ता फोडून नवीन सिमेंट रस्त्याच्या कामास  सुरुवात झाली आहे. या रस्त्याच्या कामासाठी रस्त्याकडेच्या अनेक ठिकाणीचे भुसंपादन करण्यात येणार आहे. या भुसंपादनास शेतकऱ्यांनी मोठा विरोध दर्शविला आहे. याबाबत हरकतीही घेतल्या आहेत. अगोदर हरकतीवर चर्चा करा व नंतरच रस्त्याचे काम करा अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. 

सांगोला ते पंढरपूर या सिमेंट रस्त्याच्या कामासाठी १७३ कोटी मंजूर होवुन प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे. हैद्राबाद येथील मधुकॉन कंनीच्या वतीने सिमेंट रस्त्याच्या काम सुरु केले आहे.  रस्त्याचे सिमेंट कॉक्रीटीकरण दहा मीटर असुन दोन मिटरच्या साईट्पट्या असणार आहे. पंढरपूर व खर्डी गावाजवळ एकूण दोन किलोमीटरचा रस्ता हा चारपदरी होणार आहे. सध्या मुरुम टाकणे, पाणी जाण्यासाठी पाईपलाईन टाकणे अशी कामे सुरु आहेत.

पुर्वीच्याच जमीनीचा मोबदला मिळाला नाही
पंढरपुर - सांगोला रस्त्यासाठी याअगोदर घेतलेल्या जमीनीचा मोबदला मिळाला नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी आपल्या हारकतीमध्ये म्हटले आहे. सध्याच्या भुसंपादन विभागाकडुन प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये जवळजवळ सर्वच जमीनी या जिरायत दाखवण्यात आल्या आहेत. प्रत्येक्षात अनेक ठिकाणी बोर, डाळिंबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली रस्त्याकडील डाळिंबाची झाडे काढण्यास विरोध दर्शविला आहे. रस्त्यासाठी कामासाठी किती जमिन लागणार आहे त्यापेक्षा अधिक जमिन अधिग्रहण करु नये, शेतकऱ्यांची पूर्वसूचना दिल्याशिवाय काम करु नये अशी मागणी शेतकऱ्यांमधुन होत आहे.

अनेक वर्षांपासूनची झाडे होतायत भुईसपाट 
या रस्त्याच्या कडेला असणारी अनेक वर्षांपासूनची मोठ-मोठी झाडे आज तोडली जात आहेत. काही ठिकाणची झाडे वाचविली जात असली तरी काही ठिकाणी साईपट्टीच्या नावाखाली ती तोडली जात आहेत. शेतकऱ्यांच्या डाळिंबाची झाडेही पुर्वसुचना न देता काढली जात असल्याने शेतकऱ्यांमधुन संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या सहमतीशिवाय त्यांची झाडे काढु नये अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

धुळीमुळे नागरिक त्रस्त 
या कामासाठी अनेक ठिकाणी रस्ता उखडला असुन रुंदीकरण केले जात आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुरुम भरण्याचे काम सुरु आहे. या मुरुमावर वेळेवर पाणी मारले जात नसल्याने याठिकाणी मोठी धुळ उडत आहे. या धुळीचा प्रादुर्भाव रस्त्यावरील गावांना व रस्त्याकडेला राहणाऱ्या शेतकऱ्यांना होतोय. रस्त्याच्याकडेला असलेल्या डाळिंब बागांवर तर धुळीचा मोठा थरच बसला जात आहे. यामुळे परिपक्व व विक्रीसाठी उपलब्ध झालेले डाळिंबागांना याचा मोठा फटका बसत आहे. पाईपलाईन बसविण्याच्या नावाखाली रस्ता एकाबाजुने खोदुन तीन - चार दिवस तसाच ठेवला जात आहे. त्यामुळे अशा ठिकाणी अपघात होण्याची मोठी शक्यता असते.

सांगोला- पंढरपूर रस्त्याकडील अनेक शेतकऱ्यांच्या हरकती मिळाल्या असुन याबाबत सर्व शेतकऱ्यांशी चर्चा केली जाईल. शेतकऱ्यांच्या चर्चेशिवाय भुसंपादन केले जाणार नाही. संपादीत करण्यात येणाऱ्या जमीनीचा योग्य मोबदला दिला जाईल.
- श्रावण शिरसागर, भुसंपादन आधिकारी, सोलापूर.

पी. डब्ल्यु. डीचा जुना रस्ता शेतकऱ्यांच्या सहमतीनेच झाला आहे. त्याच्या मोबदल्याचा प्रश्नच नाही. नवीन भुसंपादन केल्याशिवाय रस्त्याचे काम तेथे केले जाणार नाही असे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ शिबीर, पुणे येथील आधिकाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com