दुष्काळी भागात फुलवली स्ट्रॉबेरीची शेती

दुष्काळी भागात फुलवली स्ट्रॉबेरीची शेती

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील नाविंदगी येथे स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली आहे. ऐकून नवल वाटलं ना? हो! रमजान हजाने या कष्टकरी शेतकऱ्याने नाविंदगीत आपल्या शेतात पंधरा गुंठे जमिनीवर स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती केली आहे. महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी पिकविणारे हे पीक अक्कलकोट सारख्या प्रचंड उन्हात देखील यशस्वीरीत्या पिकविला असून ते मोठे आर्थिक उत्पन्न देणारे ठरले आहे.

स्ट्रॉबेरी हे एक बेरी वर्गीय फळ आहे. हे लाल रंगाचे फळ आहे. ते थंड प्रदेशात होते. सुगंध, लाल रंग, रसाळपणा आणि गोडवा यामुळे हे फळ प्रसिद्ध आहे. स्ट्रॉबेरी ही झुडुप वर्गिय वनस्पती आहे.

स्ट्रॉबेरी लावण्याआधी हजाने यांनी जमिनीची आणि पाण्याची पुण्यात केलेली शास्त्रीय तपासणी आणि लागवड केलेल्या साडेसहा हजार रोपांसाठींची योग्य मशागत, मल्चिंग पेपरचा वापर, योग्य पाणी आणि वेळेवर औषध फवारणी, शास्त्रोक्त पद्धतींचा वापर, वेळेवर काढणी आणि बाजारपेठेचा घेत असलेला योग्य अंदाज यामुळे ही स्ट्रॉबेरीची शेती चांगलीच बहरली आहे.

हजाने म्हणाले, ''कुणीही धाडस न करणारे आणि लागवड न करणारे स्ट्रॉबेरीचे पीक घ्यायचेच, या उद्देशाने मागील वर्षी तीन गुंठे क्षेत्रावर लागवड केली आणि ४० हजार उत्पन्न मिळविले. या वर्षी १५ गुंठे क्षेत्रावर लागवड केली आहे. शेतातला बोअर एक तास बंद ठेवल्यानंतर फक्त दहा मिनिटे चालतो. दहा हजार लिटरसाठी दोन हजार रुपये प्रति टँकर प्रमाणे विकत घेऊन ही बाग जोपासली आहे. सप्टेंबरमध्ये लागवड केली आणि डिसेंबरमध्ये उत्पादन सुरू झाले. सुरुवातीला ३०० रुपये तर आता २४० रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. या पिकाचा एकरी खर्च पाच लाख आहे; पण उत्पन्न मात्र दहा लाख रुपये सरासरी मिळते. त्यामुळे जास्त उत्पन्न मिळणारे हे पीक निवडले आहे. आणखी दीड महिना उत्पादन सुरू राहणार आहे. सुरुवातीला स्ट्रॉबेरी हिरव्या रंगाच्या असतात. नंतर जसजशी त्यांची वाढ होत जाते, तसतशा त्या लाल होत जातात. महाराष्ट्रातील हवामानात पावसाळा संपल्यावर ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात स्ट्रॉबेरीची रोपे लावल्यास हिवाळा सुरू होईपर्यंत स्ट्रॉबेरीच्या रोपांची भरपूर शाखीय वाढ होते. हिवाळ्याची पुरेशी थंडी मिळाल्यानंतर या पिकाला फुले येऊन डिसेंबरपर्यंत फलधारणा होते आणि मार्चपर्यंत उत्पादन मिळत राहते.'' 

स्ट्रॉबेरीच्या फळामध्ये कर्बोहायड्रेटस जीवनसत्त्व 'क' , 'ब' आणि कॅल्शियम, लोह, स्फुरद इत्यादी अन्नघटक भरपूर प्रमाणात असतात. स्ट्रॉबेरीच्या फळाच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागात खालीलप्रमाणे अन्नघटकाचे प्रमाण असते. यात पाणी - ८९.०%, प्रथिने (प्रोटीन्स) - ०.९%, चुना (कॅल्शियम) - ०.०३%, स्फुरद -०.०३ % , जीवनसत्त्व ' ब-२' - ०.०००१% , नियॅसीन - ०.०००४% , शर्करा (कर्बोहायड्रेटस) - ९.०% , स्निग्धांश(फॅटस) - ०.४%, लोह - ०.००१% , जीवनसत्त्व ' ब -१ ' - ०.००००३ % , जीवनसत्त्व 'क' - ०.०६%. असे प्रमाण असते.

आपल्याकडे कुठे स्ट्रॉबेरीचे पीक कोण घेतंय का, असे म्हणत कुठलीही बँक कर्ज देत नाही. कृषी अधिकारी या फळपिकाला आणि शेडनेटला अनुदान मिळत नाही म्हणतात. याचा अर्थ वेगळा मार्ग अवलंबून आधुनिक शेती या भागातील शेतकरी करायचे नाही का, असा प्रश्न मला पडला आहे. कृषी अधिकारी व बँकेने या शेतीची आणि कष्टाची जरूर पाहणी करावी. प्रामाणिक आणि कष्टाळू शेतकऱ्यांच्या पाठीशी कृषी विभाग राहणे गरजेचे आहे.

रमजान हजाने, स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com