साहेब, लोकसभेसाठी तुम्हीच; सुशीलकुमारांना आग्रह 

Sushilkumar Shinde
Sushilkumar Shinde

सोलापूर : माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना शिवसेनेचे संपर्कप्रमुख पुरुषोत्तम बरडे भेटल्यामुळे गदारोळ सुरु असतानाच, "साहेब, लोकसभेसाठी तुम्हीच...! म्हणत इंडीचे माजी आमदार रवी पाटील यांनीही श्री. शिंदे यांना भेटून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची विनंती केली. त्यास "जनावात्सल्य'वरील सूत्रांनीही दुजोरा दिला आहे. 

श्री. बरडे यांनी दोन दिवसांपूर्वी श्री. शिंदे यांची भेट घेऊन, लोकसभा निवडणुकीसाठी साकडे घातले. त्यावरून शिवसेनेत गदारोळ सुरु झाला आहे. जिल्हा प्रमुख महेश कोठे आणि श्री. बरडे यांच्यात कलगीतुरा सुरु झाला आहे. आरोप-प्रत्यारोपाने सोलापुरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यात सोशल मिडीयाही मागे नाही. त्यावरूनही दोन्ही समर्थकांमध्ये शाब्दीक चकमकी उडू लागल्या आहेत. 

शिंदे-बरडे भेटीवरून सोलापुरातील राजकारण तापले असतानाच श्री. पाटील यांनी शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष मुनाळे, महापालिकेतील गटनेते चेतन नरोटे उपस्थित होते. अनौपचारीक गप्पा झाल्यानंतर श्री. पाटील यांनी, "लोकसभेसाठी तुम्हीच उमेदवार असणे हे कॉंग्रेससाठी फायद्याचे असणार आहे. त्यामुळे तुम्हीच उभे रहा', अशी विनंती श्री. शिंदे यांना केली. त्यावर श्री. शिंदे यांनी "सुशीलहास्य' करीत वेळ मारून नेली. 

लोकसभेसाठी इच्छूक नसल्याचे श्री. शिंदे यांनी वारंवार स्पष्ट केले तरी, त्यांना सातत्याने आग्रह होऊ लागला आहे. कॉंग्रेसमधूनच नव्हे तर इतर पक्षातील नेतेही त्यांना साकडे घालू लागले आहेत. शिवसेनेचे पुरुषोत्तम बरडे आणि माजी आमदार रवी पाटील यांचे आपापल्या पक्षात वेगळे "वजन' आहे. इतर पक्षातील दोन-दोन वजनदार नेत्यांनी आग्रह धरल्याने श्री.शिंदे यांना फेरविचार करावा लागेल, अशी चर्चा सुरु झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com