सोलापुरात पालकमंत्र्यांपेक्षा भाजप शहराध्यक्ष श्रेष्ठ 

awards
awards

सोलापूर - महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या दृष्टीने पालकमंत्र्यांपेक्षा भाजपचे शहराध्यक्ष श्रेष्ठ आहेत. त्यामुळेच समितीच्या वतीने होणाऱ्या शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री विजय देशमुख यांच्याऐवजी भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांचा महापालिका पदाधिकाऱ्यांच्या यादीत समावेश केला आहे. हा कार्यक्रम आज (शनिवार) होणार असल्याचेही अनेकांना वर्तमानपत्रांतील जाहिरातीमुळे कळाले. 

शासकीय खर्चाने होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमंत्रिण पत्रिकेत पक्षभेद न ठेवता सर्वपक्षीय खासदार-आमदारांच्या नावाचा उल्लेख बंधनकारक असताना केवळ सहकारमंत्र्यांचे नाव घेऊन राजशिष्टाचाराची ऐशीतैशी केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या गटनेत्यांची नावे या पत्रिकेत आहेत, त्यांनाही हा कार्यक्रम असल्याची माहिती नसल्याचे समोर आले आहे. सभागृहनेते संजय कोळी यांनीही या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला. याबाबत पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

महिला बालकल्याण समितीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम तत्कालीन सभापती कॉंग्रेसच्या फिरदोस पटेल यांनी सुरू केला. महिलांची नावे निश्‍चित करण्यासाठी समिती नेमली. नावे निश्‍चित झाल्यावर त्याची जाहीर घोषणा करण्यात आली. कार्यक्रम पत्रिकेवर सर्वपक्षीय खासदार-आमदारांच्या नावाचा उल्लेख केला. विद्यमान सभापतींच्या कालावधीत काढण्यात आलेली निमंत्रण पत्रिका मात्र धक्का देणारी आहे. निवड केलेल्या महिलांची नावे अद्यापही गुलदस्त्यातच आहेत. 

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निधीतून होणाऱ्या कार्यक्रमाची पत्रिका ही निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडून तपासूनच अंतिम करणे आवश्‍यक आहे. मात्र ही पत्रिका स्वतःच्या सोईनुसार तयार केल्याचे स्पष्ट झाले आहे. ऐनवेळेला पत्रिका छापावी लागली असा दावा करण्यात आला, तर तोही चुकीचा आहे. कारण परिवहन समितीचे सभापती म्हणून दैदीप्य वडापूरकर यांचा उल्लेख आहे. याचाच अर्थ पत्रिका पूर्वीच तयार झाली आहे. पालकमंत्री किंवा कोणतेही खासदार-आमदार येणार नसले तरी त्यांचा नामोल्लेख करणे आवश्‍यक आहे. अगदी विधान परिषदेच्या आमदारांचाही. त्यानुसार या पत्रिकेवर नामदार चंद्रकांत पाटील, आमदार ऍड. रामहरी रूपनवर आणि शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांचाही उल्लेख आवश्‍यक होता. मात्र सहकारमंत्र्यांशिवाय एकाही लोकप्रतिनिधीच्या नावाचा उल्लेख नाही. भाजपमध्ये सुरु असलेल्या गटबाजीचाच हा परिणाम असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

कार्यक्रम सुनियोजित होता. पालकमंत्री येणार नाहीत म्हटल्यावर त्यांचा उल्लेख केला नाही. कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी जनसंपर्क अधिकाऱ्यांना कल्पना दिली होती. 
- अश्‍विनी चव्हाण, 

जनतेच्या पैशातून होणारा हा कार्यक्रम "महापालिके'चा आहे, "लोकमंगल'चा नाही याचे भान सभापतींना हवे होते. पालकमंत्र्यांचे नाव आवश्‍यकच होते, तसेच इतर लोकप्रतिनिधींचीही नावे आवश्‍यक होती. 
- चेतन नरोटे, गटनेता, कॉंग्रेस 

कार्यक्रम असल्याचे आम्हाला जाहिरातीतून कळाले. पत्रिका तयार करणाऱ्या अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करावे. याबाबत मंगळवारच्या सभेत लक्षवेधी विचारणार आहे. 
- आनंद चंदनशिवे, गटनेता, बसपा

नियमानुसार निवड केलेल्या महिलांची नावे किमान दोन दिवस अगोदर घोषित करणे अपेक्षित होते. ऐनवेळी नावे घोषित करणे म्हणजे "सोईची' नावे घेतली का अशी शंका येते. 
- फिरदोस पटेल, माजी सभापती महिला व बालकल्याण समिती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com