तरुणांकडून जिल्हा परिषदेच्या शाळेला स्वच्छतागृह!

school
school

सोलापूर : ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुसज्ज स्वच्छतागृह असावे, मुलांची कुचंबणा होऊ नये, ही भावना मनात ठेवून करमाळा तालुक्‍यातील आळजापूर येथील अशोकराव रोडे प्रतिष्ठानने मुलींसाठी स्वच्छतागृहाचे युनिट उभारले आहे. याबरोबर खेड्यातील मुलांना शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, ती पुढे गेली पाहिजेत म्हणून शाळांना ते मदत करत आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या टोकाला सीना नदीकडेला हे गाव आहे. पलीकडे अहमदनगरची हद्द सुरू होते. प्रशासन गावांमध्ये सुविधा देते, पण अनेकदा त्या कमी पडतात. हागणदारीमुक्त गाव, स्वच्छता व शैक्षणिक सुविधा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्याला आपल्या पद्धतीने स्वयंसेवी संस्थांसह अनेक तरुणही हातभार लावत आहेत. यातूनच अशोकराव रोडे प्रतिष्ठानने गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलींसाठी स्वच्छतागृहाचे युनिट उभारले आहे. तरुणांनी एकत्र येऊन हे प्रतिष्ठान उभारले आहे. येथील शाळेत स्वच्छतागृह होते. परंतु, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार त्यांनी हे स्वच्छतागृह दिले आहे. त्यात त्यांनी पाण्याची सुद्धा सुविधाही दिली आहे. ग्रामीण भागात स्वच्छतागृहाचा वापर न होण्यामागे पाण्याचा अभाव असल्याचे अनेकदा समोर आले. त्यातून त्यांनी पाण्याची व्यवस्था केली. येथे जिल्हा परिषदेची सातवीपर्यंत शाळा आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय रोडे, सचिव शरद रोडे व ग्रामसेवक सुरेश रोडे यांनी यासाठी पुढाकार घेतला.

प्रतिष्ठानने शाळेच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष लावली आहेत. मुलांना शालेय अभ्यासाबरोबर इतरही पुस्तकं वाचता यावीत, वाचनासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ग्रंथालयाला पुस्तकं दिली आहेत. विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांना वाव मिळावा म्हणून क्रीडा, सांस्कृतिक व इतर स्पर्धाही घेतल्या जात आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी विज्ञानातही पुढे गेला पाहिजे म्हणून त्यांनी तालुक्‍यातील एका शाळेला प्रयोगशाळेचे साहित्य भेट दिले आहे. 

ग्रामीण भागात मदत... 
ग्रामीण भागात शिक्षण घेताना आपल्याला ज्या अडचणी येत होत्या त्या मुलांना आल्या नाहीत पाहिजे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलं पुढे गेली पाहिजेत. सरकार त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे, त्याला आपलाही हातभार लागावा म्हणून आम्ही शाळांना मदत करत आहोत. यापुढेही जिल्हा परिषदेच्या शाळांना आम्ही शक्‍य तेवढी मदत करणार असल्याचा मानस प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय रोडे यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com