परीक्षा म्हणजे आयुष्य नव्हे!

परीक्षा म्हणजे आयुष्य नव्हे!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांना शुक्रवारी परीक्षा, त्यातील ताण-तणाव, अपयश आदींविषयी ‘मन की बात’ सांगितली. नेमके त्याच दिवशी ’बीएचएमएस’ परीक्षेतील अपयशाच्या नैराश्‍यातून नागठाण्यातील युवकाने आत्महत्या केली. ही दुर्दैवी, तितकीच वेदनादायी बाब ठरावी. आकाश सुतार हे त्या युवकाचे नाव. तो वैद्यकीय परीक्षेत नापास झाला होता.

तसे पाहिले तर परीक्षा ही ‘कसोटी’च असते. आपल्याकडे तिला अवास्तव, अवाजवी महत्त्व लाभले आहे. त्यामुळेच ही परीक्षा केवळ त्या विद्यार्थ्यापुरती मर्यादित राहत नाही. ती शिक्षकांची, पालकांची, नव्हे तर आख्ख्या कुटुंबाचीच बनून जाते. परीक्षेत चांगले गुण मिळाले की तो विद्यार्थी हुशार. नापास झालेला विद्यार्थी ‘ढ’, अशी आपल्या समाजाची मानसिकता बनली आहे. या अनुषंगाने शिक्षणतज्ज्ञांपासून विचारवंत, समाजधुरिणांनी कित्येक विचार मांडले आहेत. त्यावर मतमतांतरे झाली आहेत.

शासनानेही  आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याचे धोरण राबविले आहे. अर्थात तरीही परीक्षेतील एखाद्या अपयशाने खचून आपले जीवन संपविण्याच्या  बातम्या अधूनमधून प्रसिद्ध होतच असतात. 

खरे तर एका परीक्षेत अपयशी होणे म्हणजे संपूर्ण आयुष्यात अपयशी होणे, असे नव्हे. महात्मा गांधींपासून इंदिरा गांधींपर्यंत, सचिन तेंडुलकरपासून आमिरखानपर्यंत कित्येक कर्तृत्ववान, कर्तबगार दिग्गजांना शालेय जीवनात कधी न कधी अपयशी ठरावे लागले होते. नापास व्हावे लागले होते. अर्थात म्हणून त्यांचा जीवनप्रवास कधीही थांबला नाही. उलटपक्षी ज्या क्षेत्रात त्यांना गती होती, त्या क्षेत्रात त्यांनी गरुडझेप घेतली. नाव कमाविले.

शेवटी केवळ परीक्षेतील गुण म्हणजे गुणवत्ता नव्हे. उलटपक्षी परीक्षेत चांगले गुण मिळवून वास्तव जीवनात अपयशी ठरणारी उदाहरणेही आपल्या अवतीभवती दृष्टीस पडतात.

या पार्श्‍वभूमीवर पालकांनी, समाजाने आपली मानसिकता बदलणे अधिक उचित ठरेल. आता लवकरच परीक्षांची सुगी सुरू होईल. या परीक्षांकडे अधिक विस्तीर्ण दृष्टीने पाहणे हितावह ठरेल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com