राज्यात साखर कारखाने वाढले; उत्पादन घटले 

राज्यात साखर कारखाने वाढले; उत्पादन घटले 

पंढरपूर - मागील 10 वर्षांत सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांची संख्या झपाट्याने वाढली असली तरी ऊस आणि साखर उत्पादन मात्र घटल्याचे चित्र आहे. सततची दुष्काळी परिस्थिती आणि ऊसदरातील अनिश्‍चितता ही यामागची प्रमुख कारणे असल्याचे साखर तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

राज्य साखर आयुक्तालयाने गाळप हंगाम 2007-2008 ते 2016-17 या मागील 10 वर्षांतील ऊस गाळप, साखर उत्पादन आणि साखर उतारा या संबंधीची एकत्रित माहिती प्रसिद्ध केली आहे. साखर आयुक्त कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून मागील 10 वर्षांपासून (अपवाद वगळता) राज्यातील ऊस, साखर उत्पादनाचा आलेख घसरला आहे. त्याचबरोबर साखर उताऱ्यातही सरासरी पाव टक्‍क्‍याने घट दर्शविण्यात आली आहे. 

गेल्या 10 वर्षांत राज्यातील साखर कारखान्यांनी सहा हजार 773 लाख टन उसाचे गाळप केले असून, सात हजार 968 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. ऊस उत्पादनबरोबर साखर उतारादेखील घटल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून समोर आले आहे. वाढत्या साखर उत्पादनामुळे साखरेचे भाव गडगडल्याचा साखर कारखानदारांचा दावा फोल ठरला आहे. गाळप हंगाम 2007-2008 मध्ये राज्यातील 145 सहकारी व 28 खासगी मिळून 173 साखर कारखान्यांनी 761.74 लाख टन उसाचे गाळप करून 909.8 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. त्या वेळी सरासरी उच्चांकी 11.94 टक्के इतका साखर उतारा मिळाला होता. त्यानंतर झालेल्या दोन हंगामांत ऊस उत्पादन सरासरी तीन लाख टनांनी कमी झाले होते. चार वर्षांनंतर पुन्हा (2010- 2011 मध्ये 808.52 लाख टन गाळप) 41 लाख टनांनी ऊस उत्पादनात वाढ दर्शविण्यात आली आहे. त्यानंतर सलग तीन वर्षांच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये ऊस व साखर उत्पादन सरासरी एक ते दीड लाख टनांनी घटले. 

""मागील 10 वर्षांत राज्यातील साखर कारखान्यांची संख्या वाढली आहे. वाढत्या साखर कारखान्यांमुळे उसाच्या उत्पादनात वाढ अपेक्षित होती; मात्र दुष्काळी परिस्थिती आणि ऊसदरातील अनिश्‍चितता यासह इतर कारणांमुळे ऊस उत्पादनात घट झाल्याचे चित्र आहे. यंदाच्या वर्षी जवळपास 720 लाख टन गाळप होईल, अशी शक्‍यता आहे. पुढच्या वर्षीदेखील राज्यात विक्रमी उसाचे उत्पादन अपेक्षित आहे.'' 
संजय खताळ, व्यवस्थापकीय संचालक, राज्य साखर संघ, मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com