वाईतील वैद्यकीय कचऱ्याचे "पाप' कुणाचे? 

वाईतील वैद्यकीय कचऱ्याचे "पाप' कुणाचे? 

वाई  - पालिकेच्या सोनापूर येथील कचरा डेपोच्या समोर औद्योगिक वसाहतीच्या मोकळ्या जागेत काल रात्री एक ट्रकभर जैव-वैद्यकीय कचरा (बायोमेडिकल वेस्ट) आणून टाकल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. शहरातील स्वच्छ सर्वेक्षण 2018 अभियानाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या दिवशीच हा कचरा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत अज्ञाताविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मांढरदेव रस्त्याकडेला औद्योगिक वसाहतीच्या मोकळ्या जागेत काल रात्री दहाच्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने एका व्हॅनमधून मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकला. ही बाब भाजपचे तालुका सरचिटणीस अली आगा यांच्या निदर्शनास आली. त्यांनी पक्षाच्या अन्य पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. सकाळी जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ शेलार, तालुकाध्यक्ष सचिन घाटगे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाहणी केली असता डॉक्‍टरांनी दिलेली प्रिस्क्रीप्शन्स, सिरींज, सलाईनच्या नळ्या, बाटल्या, प्लॅस्टर, मुदतबाह्य औषधे यांचा समावेश त्यात होता. काही ठिकाणी उघड्यावर तर काही ठिकाणी पोत्यांमधून कचरा टाकण्यात आला होता. या कचऱ्यात काही लहान मुले शोधाशोध करीत होती. त्यांना कार्यकर्त्यांनी हाकलून लावले आणि संबंधित सर्व यंत्रणांना याबाबतची कल्पना दिली. पालिका आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, आय.एम.ए. व केमिस्ट संघटनेचे पदाधिकारी, ग्रामीण रुग्णालय व बावधन प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्‍टर घटनास्थळी आले. नायब तहसीलदार सुरेश पिसाळ यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनित फाळके यांनी घटनास्थळी भेट दिली. 

कोण काय म्हणाले...  
विकास पाटील (स्थानिक नागरिक) -
या ठिकाणी अशा प्रकारचा कचरा टाकण्यात येऊन पेटवून दिला जातो. त्यामुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत असून, 2007 पासून प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही दखल घेतली गेली नाही. 

डॉ. अरुण पतंगे (आयएमएचे अध्यक्ष) - हा कचरा आयएमएचे सदस्य असलेल्या हॉस्पिटलमधील नाही. अशा प्रकारे उघड्यावर जैव-वैद्यकीय कचरा टाकणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. 

अरुण पवार (तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष) - औषध विक्रेत्यांकडील मुदतबाह्य औषधांची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. त्यामुळे या कचऱ्यात आढळलेल्या औषधांशी वाईतील औषध विक्रेत्यांचा काहीही संबंध नाही. 

काशिनाथ शेलार (भाजपचे उपाध्यक्ष) - पालिका मुख्याधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी, तहसीलदार, आरोग्य अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात येत नाही, असे सांगून जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न केला. चार तासांनंतर प्रशासकीय यंत्रणा जागी झाली. 

बाबासाहेब कुकडे (प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी) - वाई व परिसरातील हॉस्पिटल्सना नोटिसा काढण्यात येत आहेत. त्यांनी गेल्या सहा महिन्यांत वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली, याची माहिती मागविण्यात येत आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com