जिल्ह्यातील 150 गावांत भासणार टंचाई 

जिल्ह्यातील 150 गावांत भासणार टंचाई 

सातारा - यंदा पाऊसमान चांगले झाले असल्याने जलयुक्‍त शिवार अभियानातील, तसेच जलसंधारणाची कामे झालेल्या गावांत जलसाठे वाढले आहेत. परिणामी, फेब्रुवारी महिना संपत आला तरी अवघा एकच टॅंकर सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने जूनअखेरचा आठ कोटी खर्चाचा टंचाई कृती आराखडा बनविला आहे. त्यात जिल्ह्यातील सुमारे 145 गावे व 68 वाड्या-वस्त्यांवर टंचाई भासण्याचा अंदाज बांधला आहे. 

सातारा जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती विरोधाभासाची असून, पश्‍चिमेकडे भरपूर पर्जन्य, तर पूर्वेकडे दुष्काळी स्थिती असते. माण, खटाव, उत्तर कोरेगाव या तालुक्‍यांत प्रामुख्याने दुष्काळाची तीव्रता जास्त असते. फलटण, खंडाळा तालुक्‍यांमध्ये विविध धरणांचे कालव्यांद्वारे पाणी पोचले असल्याने तेथील काही भागांत दुष्काळी समस्या कमी होत आहे. कऱ्हाडच्या उत्तर भागात मात्र दुष्काळी गावे वाढत आहेत. पाटण, महाबळेश्‍वर, वाईमध्येही पाण्याचे झरे आटत असल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र होते. 

त्या पार्श्‍वभूमीवर टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने आठ कोटी 17 लाखांचा आराखडा बनविला आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ऑक्‍टोबर ते जूनअखेर जिल्ह्यातील 145 गावे व 68 वाड्या-वस्त्यांवर टंचाई भासू शकते. दुष्काळग्रस्त भागात पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे 325 टॅंकरची आवश्‍यकता लागण्याचा अंदाज आहे. गतवर्षी 135 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. गत पावसाळ्यात जास्त पाऊस झाल्याने यावर्षी सुमारे 70 ते 100 टॅंकरची आवश्‍यकता भासेल. सध्या आवळेपठार (गारवडी, ता. खटाव) येथे एकच टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. 

दरम्यान, गतवर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असल्याने पाणीटंचाई कमी भासण्याची शक्‍यता प्रशासनाकडून व्यक्‍त केली जात आहे. जिल्ह्याची सरासरी 918.9 असून, गतवर्षी एक हजार 182 मिलिमीटर पाऊस झाला आहे. दुष्काळी माणमध्ये सरासरीपेक्षा 42.8, खटावमध्ये 240 मिलिमीटर इतका जास्त पाऊस झाला आहे. मात्र, कोरेगाव व पाटणमध्ये अनुक्रमे 170 व 465 मिलिमीटर इतका सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. 

गतवर्षीचा तालुकानिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये ः सातारा- 957, जावळी- 1617, पाटण- 1267, कऱ्हाड- 735, कोरेगाव- 472, खटाव- 654, माण- 485, फलटण- 538, खंडाळा- 584, वाई- 790, महाबळेश्‍वर- 4898. 

टंचाई आराखड्यातील प्रमुख तरतुदी (आकडे कोटीत) 
नवीन विंधन विहिरी, कूपनलिका घेणे : 1.36 
नळ पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती : 1.14 
तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजना : 00.62 
खासगी विहिरी अधिग्रहित करणे : 00.69 
टॅंकरने पाणीपुरवठा : 2.59 

जिल्ह्यात गतवर्षी पाऊसमान चांगले झाले आहे. जलयुक्‍त शिवार अभियान, लोकसहभागातून झालेल्या जलसंवर्धनाच्या कामांमुळे जलसाठे वाढलेत. त्यामुळे यावर्षी टंचाईची तीव्रता कमी भासेल. टॅंकरची संख्याही 100 पेक्षा कमी लागेल. 
- संजय पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com