ऑनलाइनवर शिरजोर; बाजारपेठा कमजोर

ऑनलाइनवर शिरजोर; बाजारपेठा कमजोर

सांगली - मोठ्या नोटांच्या बंदीनंतर ठप्प झालेली बाजारपेठ सावरता सावरेना. एका बाजूला स्थानिक बाजारपेठा ओस पडल्या आहेत; तर दुसऱ्या बाजूला फक्‍त ऑनलाइन व कार्डवर ज्यांच्याकडे चलन आहे तेवढेच जोरात आहेत. ‘एटीएम’ आणि बॅंकेतून शंभर रुपयांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. नवी दोन हजाराची नोट मिळत आहे; पण ती बाजारात घेऊन गेल्यानंतर नव्याच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे पाचशेला चारशे, तर हजारला नऊशे अशा आपत्तीतही लोकांना लुबाडण्याचा धंदा तेजीत आला आहे. त्यामुळे सामान्य माणूस वैतागला आहे.  

काल सुटी होती. बॅंका आज पुन्हा सुरू झाल्या. पैसे भरण्यासह काढण्यासही लोकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे; मात्र पुरेशा प्रमाणात चलन उपलब्ध होत नसल्याने लोकांना बराच काळ रांगेत उभे राहूनही पुरेसे पेसे मिळत नाहीत. मिळतात तेवढे पदरात पाडून घेतले जात आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील सर्वच एटीएमधील पैसे दुपारपर्यंतच पुरतात. नो कॅश, एटीम बंद असे फलक झळकतात. मशीनचा वापर करायला गेल्यास ‘धीस एटीएम इज आऊट ऑफ सर्व्हिस’ असा संदेश मिळतो. त्यामुळे बाजारपेठेत व्यवहार होत नाहीत. कोट्यवधींची उलाढाल ठप्प आहे. बॅंका, पोस्ट खाते या ठिकाणी आजही खातेदारांची अक्षरशः झुंबड उडाली. काही प्रमाणात शंभर, तर दोन हजारची नवीन नोट हाती आल्यानंतर आनंद व्यक्त केला जातो. मात्र बाजारात ती नोट देऊन व्यवहार करायचा म्हटले, तर सुट्याअभावी स्वीकारली जात नाही. हाती दोन हजाराची नोट, पण त्याचा उपयोग नाही, अशी स्थिती आहे. 

दवाखाने, औषध दुकाने किंवा अन्य अत्यावश्‍यक ठिकाणी जास्त पैसे लागणार आहेत तिथे अडचणी होत आहे. सुट्याचा प्रश्‍न निर्माण झाल्याने मंडईसह कापड दुकाने, सौंदर्य प्रसाधने, धान्य दुकान, गॅस, चित्रपटगृह, भांड्यांची दुकानासह मोठ्या मॉलमध्येही गर्दी कमी आहे. गेल्या आठवड्यात ५० टक्‍क्‍यांनी व्यवसायात घट झाल्याचे व्यापारी, व्यावसायिकांनी सांगितले आहे. हजारच्या जुन्या नोटा खिशात असूनही अनेकांना बस व रिक्षाने प्रवास करता येत नाही. पायी चालत जाणारे संताप व्यक्त होत आहे.

कामगारांचे रोखीतले पगार थांबले 
सांगली, कुपवाड, मिरजेतील औद्योगिक वसाहतीतील कामगारांचे पगार थांबले आहेत. तिथे सुमारे २५ हजार कामगार आहेत. त्यांचे पगार रोखीने केले जात असल्याने कारखानदारांची तारांबळ उडाली आहे. मोठ्या प्रमाणात पैसे उपलब्ध होत नसल्यामुळे उद्योजकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

पेठा थंड; आठवडा बाजार ओस 
कापड पेठ, गणपती पेठ आणि हरभट रोडवर वर्दळ थांबली आहे. दुकानदार निवांत आहेत. सुट्या पैशांचे वांदे असल्यामुळे आठवडा बाजारही ओस पडू लागलेत. शेतकऱ्यांचा माल विकला जात नसल्याने नुकसान होत आहे. लोकांना फटका बसत आहे. शहरवासीयांनाही रोज भाजी घरी आणण्यासाठी सुटे पैसे नसल्याने अडचण येत आहेत.

टक्केवारीने सुटे पैसे 
सुटे पैसे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने काहींनी टक्केवारीचा फंडा सुरू केला आहे. पाचशेला चारशे रुपये, तर हजारला नऊशे रुपये अशा पद्धतीने टक्केवारी सुरू आहे. पेट्रोल पंप, मेडिकलसह अनेक ठिकाणी असे व्यवहार सुरू आहेत. सामान्य नागरिकांनाच भुर्दंड सासावा लागत आहे. 

तासगावला व्यवहार कोलमडले
तासगाव - हजार, पाचशेच्या नोटा रद्द करून आठ दिवस झाले तरी बॅंकेतील रांगा कमी होत नाहीत. त्या वाढू लागल्यात. आज सकाळी आठपासून नोटा बदलून घेण्यासाठी बॅंकांसमोर रांगांचे चित्र सर्वत्र होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com