बाजार समितीसाठी सहकारमंत्री देशमुख देणार एकाकी झुंज

For the market committee election Deshmukh against all parties
For the market committee election Deshmukh against all parties

सोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पालकमंत्र्यांनी कॉंग्रेस व शिवसेनेबरोबर लढण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे सहकारमंत्र्यांना या निवडणुकीत एकाकी पाडण्याचा डाव कितपत यशस्वी होतो याचे चित्र तीन जुलै रोजी स्पष्ट होणार आहे. 

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सिध्दरामेश्‍वर बाजार समिती परिवर्तन पॅनेल माजी आमदार शिवशरण पाटील हे पॅनलप्रमुख आहेत. तर दुसऱ्या पॅनलमध्ये भाजपचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा इंदूमती अलगोंड-पाटील, कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक सुरेश हसापुरे, शिवसेनचे जिल्हा युवासेनाप्रमुख गणेश वानकर यांचे वडील तथा शिवसेनेचे नेते प्रकाश वानकर यांचा समावेश असल्याची चर्चा आहे.

महापालिका असो की जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक असो, यामध्ये सहकारमंत्री व पालकमंत्री यांचे सूत कधीच जुळले नाहीत. त्याचा प्रत्यय बाजार समितीच्या निवडणुकीत येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस व शिवसेनेच्या मदतीने पुन्हा आमदार होण्यासाठी पालकमंत्र्यांनी कॉंग्रेस व शिवसेनेशी जवळीकता साधल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.


केंद्रीयमंत्री शिंदे यांचा वॉच

सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे माजी केंद्रीयमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्यासह आमदार प्रणिती शिंदे, आमदार सिध्दराम म्हेत्रे आदी नेतेमंडळींनी अधिक लक्ष घातले आहे. त्यांनी काही झाले तरी सहकारमंत्र्यांची सत्ता बाजार समितीवर येता कामा नये, यासाठी ऍडजेस्‌मेंट करण्याचा प्रयत्न केला आहे. सहकारमंत्र्यांबरोबर कधीही न जुळलेल्या पालकमंत्र्यांना सोबत घेऊन कॉंग्रेसने राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेच्या काही उमेदवारांना संधी दिल्याची चर्चा आहे. 

सहकारमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला 
शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा स्वतंत्र कायदा करण्यासाठी सहकारमंत्र्यांनी मोठी भूमिका बजावली. तसेच सोलापूर बाजार समितीत अनियमितता केल्याप्रकरणी तत्कालीन संचालकांविरोधात निवडणुकीच्या तोंडावर गुन्हे दाखल केले. मात्र न्यायालयीन लढाईत त्या संचालकांनी कारवाईला स्थगिती मिळविली आणि बाजार समितीचे अर्ज उमेदवारीही मंजूर करुन घेतले. भाजपचेच पालकमंत्री विजयकुमार देशमुख कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना यांच्याबरोबर गेल्याने सहकारमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार असल्याचे बोलले जात आहे.


आजपासून प्रचाराला सुरुवात 
सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले. बाजार समितीसाठी भाजप विरुध्द पालकमंत्री-कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना तसेच शेतकरी संघटना अशी तिरंगी लढत होणार आहे. उद्या (बुधवार) पासून प्रचाराला सुरूवात होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com