मायणीत ‘रोडरोमिओं’नी काढले डोके वर

मायणीत ‘रोडरोमिओं’नी काढले डोके वर

मायणी - येथील कॉलेज मार्गावर ‘रोडरोमिओं’ची वर्दळ वाढली असून शाळा, कॉलेज भरण्या-सुटण्याच्या कालावधीत त्यांच्या गाड्या सुसाट धावू लागल्या आहेत. मुलींचा पाठलाग करणे, हॉर्न वाजवत मुद्दामच गर्दीतूनही गाड्या पळवणे, लगट करणे, छेडछाड करणे, लागेल असे बोलणे अशा विविध कारनाम्यांनी महाविद्यालयीन तरुणी व काही शाळकरी मुली त्रस्त आहेत. असुरक्षितता व भीतीने त्या अस्वस्थ होत आहेत. 

येथून जाणाऱ्या मल्हारपेठ-पंढरपूर राज्य मार्गालगत व पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे शैक्षणिक संकुल आहे. तेथे वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशाला, भारतमाता इंग्लिश मीडियम स्कूल, फार्मसी कॉलेज, कला, वाणिज्य व सायन्स महाविद्यालय अशी शिक्षणाची विविध दालने आहेत. त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मुली शिक्षण घेत आहेत. परिसरातील सुमारे ३० गावांतील एक हजारांवर शाळकरी व महाविद्यालयीन मुली त्या शिक्षण संकुलात दररोज ये-जा करतात. तसेच खेड्यापाड्यातून, वाड्या-वस्त्यांवरून टायपिंग कोर्ससह विविध क्‍लासेसमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या मुलींची संख्याही मोठी आहे.

बहुतांशी मुली एसटी बसनेच ये-जा करतात. येथील बस स्थानक वा चांदणी चौकात बसमधून उतरून त्यांना कॉलेजकडे जावे लागते. 

त्यासाठी शिक्षण संकुलापर्यंत सुमारे दीड-दोन किलोमीटरची पायपीट करावी लागते. शाळा कॉलेजला ये-जा करताना त्यांना ‘रोडरोमिओं’च्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कधी सुसाट वेगाने कसरत करीत गाड्यांवरून तरुण फेऱ्या मारत असतात. तर गर्दीतून मुद्दाम मोठमोठ्याने हॉर्न वाजवत गाडी घासून नेली जाते. कधी भाईगिरी करीत तर कधी वेगवेगळ्या कलागती करीत तरुणींचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दुर्लक्ष केले तरीही अनेकदा लज्जास्पद वा चीड निर्माण कऱणारी वक्तव्ये करण्यात येतात. कधीकधी काळजाचा ठोका चुकेल, अशा भीतीदायक शब्दांचा वापर करण्यात येतो आहे. कॉलेज सुटल्यानंतर बस स्थानकापर्यंत टोळकी मुलींचा पाठलाग करतात. बस स्थानकातही विनाकारण फेऱ्या मारत असतात. त्यामुळे काही शाळकरी, महाविद्यालयीन तरुणी भयभीत झालेल्या आहेत. त्यांना असुरक्षित वाटत आहे. त्यामुळे पालकही त्यांना कॉलेजला पाठवत नसल्याचे निदर्शनास येत आहे. अनेक तरुणींचे कॉलेजला येणे बंद झाले आहे. महाविद्यालयातील मुलींच्या दैनंदिन उपस्थितीत कमालीची घट झाली आहे. दरम्यान, काही तरुणींना फूस लावून पळवून नेण्याचेही प्रकार येथे घडले आहेत. मात्र, त्याची फारशी वाच्यता होताना दिसत नाही. पोलिसांनी अशा टोळक्‍यांवर, कॉलेज रोडने वारंवार फेऱ्या मारणाऱ्या, अकारण तेथे घुटमळणाऱ्या, रस्त्याने मस्ती करीत गाडी सुसाट चालवणाऱ्या तरुणांवर कठोर कारवाई करण्याची आवश्‍यकता आहे. वाहन चालवण्याचा परवाना नसलेले अनेक तरुण, शाळकरी मुलेही गाड्या वेगाने फिरवत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करणे आवश्‍यक आहे.

पोलिस अधिकारी बदलल्याचा परिणाम 
पोलिस अधिकारी बदलल्यापासून ‘रोडरोमिओं’नी डोके वर काढले आहे. पोलिसांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे असल्याचे एका पालकाने नाव प्रसिध्द न करण्याच्या बोलीवर सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com