गुदगे विरुद्ध कचरे सामना रंगणार?

गुदगे विरुद्ध कचरे सामना रंगणार?

मायणी - सरपंचपदाच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या विविध कार्यकर्त्यांना थोपवत, रुसवे फुगवे काढत, मतांची गोळाबेरीज मांडून अखेर गुदगे गटाने सरपंचपदासाठी दादासाहेब कचरे यांचे नाव घोषित केले, तर येळगावकर गटाने अद्याप सरपंचपदासाठीच्या उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात ठेवले आहे. मात्र, काहीही झाले तरी येळगावकर गटाकडून सचिन गुदगेंचेच नाव जाहीर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मायणी ग्रामपंचायतीत गुदगे विरुद्ध येळगावकर नव्हे, तर गुदगे विरुद्ध कचरे असाच सामना रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. 

माजी आमदार भाऊसाहेब गुदगे यांच्या निधनानंतर विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे व त्यांचे धाकटे बंधू सचिन गुदगे यांनी घरात व दारातही वेगळी चूल मांडली. सचिन यांच्या भाजप प्रवेशानंतर तर दोघा भावांतून विस्तवही जात नसल्याचे स्पष्ट झाले. सचिन यांनी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांच्या नेतृत्वाखाली मागील जिल्हा परिषद निवडणूक लढवली. त्या वेळी गुदगे बंधू एकमेकांविरुद्ध लढले. त्यामध्ये नवख्या सचिन यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर मायणी अर्बन बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीतही अनेकांचे उमेदवारी अर्जच अवैध झाल्यामुळे पुन्हा पदरी अपयश आले. आता ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंचाची निवड होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुरेंद्र गुदगे यांना शह देण्यासाठी येळगावकर गटाकडून सचिन गुदगेंना रिंगणात उतरवण्यासाठी गळ घातली जात आहे. 

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे. मात्र, अद्याप येथील दोन्ही गटांकडून झाकली मूठ सव्वालाखाची असे धोरण अवलंबले दिसते. मात्र, निवडणूक तोंडावर आली असून, पुन्हा प्रचाराला पुरेसा वेळ मिळणार नसल्याच्या कारणाने गुदगेंनी तातडीची बैठक घेऊन सरपंचपदासाठीचा उमेदवार निश्‍चित केला. माजी उपसरपंच दादासाहेब कचरे यांचे नाव सरपंचपदाच्या उमेदवारीसाठी जाहीर केले आणि अनेक दिवसांची कार्यकर्ते व नागरिकांची ताणलेली उत्सुकता संपली. इकडे कचरे यांचे नाव जाहीर झाले असले, तरी येळगावकर गटाने मात्र सचिन गुदगेंच्या नावाची अद्याप जाहीर घोषणा केलेली नाही. मात्र, येळगावकरांकडे सचिन गुदगेंशिवाय दुसरा चांगला पर्याय नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे सचिन यांची उमेदवारी सरपंचपदासाठी निश्‍चित मानली जात आहे. येळगावकर गटाकडून त्यास दुजोरा मिळत आहे. त्यामुळे दादासाहेब कचरे विरुद्ध सचिन गुदगे असाच सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. 

दरम्यान, सुरेंद्र गुदगेंची घोडदौड रोखण्यासाठी गुदगेंचे सर्व विरोधक एकवटू लागले आहेत. काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांचे येथील स्थानिक कार्यकर्ते सध्या येळगावकर गटाला मिळाले आहेत. शिवसेना स्वतंत्र पॅनेल टाकणार असल्याचे स्थानिक नेते सचिन भिसे यांनी जाहीर केले. मात्र, त्यांचे अद्याप तळ्यात मळ्यात सुरू आहे. ‘राष्ट्रवादी’च्या शेखर गोरे गटाचे येथील कार्यकर्तेही येळगावकर गटालाच मदत करण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

उमेदवारांची कच्ची यादी तयार 
दोन्ही गटांकडून सरपंच व सदस्यांसाठीच्या उमेदवारांची कच्ची यादी तयार केली आहे. काहींचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले आहेत. मात्र, राजकीय खेळी म्हणून सर्व पत्ते उघड केलेले नाहीत.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com