पदोन्नतीसाठी आता प्रगत शाळेचा निकष!

संजय जगताप
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

मायणी - शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी शिक्षण खात्याने अतिशय जाचक अटी घातल्या आहेत. त्यामुळे अपवाद वगळता बहुतांशी शिक्षकांना वरिष्ठ व निवडश्रेणी मिळणे अशक्‍य होणार आहे. या शासन धोऱणाविरुद्ध शिक्षकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

मायणी - शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी शिक्षण खात्याने अतिशय जाचक अटी घातल्या आहेत. त्यामुळे अपवाद वगळता बहुतांशी शिक्षकांना वरिष्ठ व निवडश्रेणी मिळणे अशक्‍य होणार आहे. या शासन धोऱणाविरुद्ध शिक्षकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

शिक्षकांना एकाच वेतनश्रेणीत १२ वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यात येते. तर एकाच वेतनश्रेणीत २४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवडश्रेणी देण्यात येते. त्यासाठी संबंधित शिक्षकाने त्याची विहित शैक्षणिक अर्हता वाढवणे व प्रशिक्षण घेणे आवश्‍यक असते. बहुतांशी शिक्षक निवडश्रेणी मिळावी, यासाठी आपली शैक्षणिक अर्हता वाढवतच असतात. त्या ज्ञानाचा विद्यार्थ्यांनाही फायदा होत असतो. सेवा काळात सर्वांनाच बढती मिळणे अशक्‍य असते.

म्हणूनच ठराविक १२ वर्षे व २४ वर्षे एकाच वेतनश्रेणीत सेवा बजावलेल्या शिक्षकांना विशिष्ट वेतनश्रेणी देण्याचा नियम आहे. आतापर्यंत हजारो शिक्षकांनी वरिष्ठ व निवडश्रेणी घेतल्या आहेत. मात्र, आता वरिष्ठ व निवडश्रेणीच्या उंबरठ्यावर असलेल्या शिक्षकांना सहजासहजी त्या श्रेणी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नेहमीच्या पूर्तता केल्या असल्या तरी, वरिष्ठ व निवडश्रेणी हवी असल्यास संबंधित शाळा ही ‘शाळा सिद्धी’ योजनेनुसार ‘अ’ श्रेणीमध्ये असणे अनिवार्य करण्यात आले आहे. इयत्ता
 पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळांसाठी तो नियम लागू कऱण्यात आला 
आहे. माध्यमिक शाळेतील इयत्ता नववी आणि दहावी या वर्गांचे निकालही ८० टक्‍क्‍यांवर असणे आवश्‍यक आहे.

त्या अटींची पूर्तता कऱणे शिक्षकांसाठी जिकिरीचे आहे. कारण हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍या शाळाच ‘शाळा सिद्धी’नुसार ‘अ’ श्रेणीत आहेत. काही शाळा प्रशासनांनी प्रतिष्ठेसाठी ओढूनताणून आपल्या शाळा ‘अ’ श्रेणीमध्ये आणल्या आहेत. बहुतांशी शाळा ‘ब’ आणि ‘क’ श्रेणीत आहेत. त्या शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांची बदली ‘अ’ श्रेणीतील शाळेत झाल्यास संबंधितांचा फायदा होणार आहे. मात्र, अकरा-साडेअकरा वर्षे ‘अ’ श्रेणीमधील शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकाची बदली ‘ब’ वा ‘क’ श्रेणीच्या शाळेत झाली तर त्या शिक्षकांसही वरिष्ठ वा निवडश्रेणीपासून दूर राहावे लागणार आहे. त्यामुळे नव्या शासन निर्णयाचा शिक्षक वर्गातून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. 

शासनाच्या व विशेषतः शिक्षण विभागाच्या वारंवार निघणाऱ्या फतव्यांवर शिक्षक तोंडसुख घेत आहेत. सोशल मीडियावर नव्या शासन निर्णयाला कडाडून विरोध होत आहे. दरम्यान, नवीन शासन निर्णयाने यापूर्वीचे वरिष्ठ व निवडश्रेणी संदर्भातील सर्व निकष व पात्रता रद्द ठरविल्या आहेत. शासनाने प्रशिक्षणाची व्यवस्था तर केलीच आहे. मात्र, या नवीन समाविष्ट केलेल्या अटींची पूर्तता केल्यानंतरच शिक्षक वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी पात्र होणार आहेत. शहरी-ग्रामीण, विभिन्न कौटुंबिक, सामाजिक व आर्थिक परिस्थितीतून येणारे सर्वच विद्यार्थी हे सारख्याच बुद्धिमत्तेचे कसे असतील. सर्वच शाळा प्रगत म्हणजेच ‘ए’ श्रेणीत कशा काय येतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिक्षकांच्या वरिष्ठ वा निवडश्रेणीचा संबंध वरिष्ठ वा निवडश्रेणीसाठी लावणे केवळ हास्यास्पद असल्याचे मत अनेक शिक्षकांनी ‘सकाळ’जवळ व्यक्त केले. 

शिक्षक, शेतकरी, वा कुणीही असो, कोणाला काहीही द्यायचे नाही. ही शासनाची भूमिका आहे. कोणीही आज समाधान नाही.
- सयाजीराव जाधव, शिक्षक