धोंडेवाडीजवळ अपघातात श्रीराम महाराजांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

मायणी-गोंदवले - श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे अनुयायी, नर्मदा काठी बडवाह (मध्य प्रदेश) येथील श्रीराम महाराज संस्थान व समर्थ कुटी आश्रमाचे संस्थापक सद्‌गुरू श्रीराम महाराज इनामदार (वय 63) यांचा काल (ता. 18) झालेल्या अपघातात मृत्यू झाला. अन्य दोन पुरुष व महिला साधक गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

मायणी-गोंदवले - श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे अनुयायी, नर्मदा काठी बडवाह (मध्य प्रदेश) येथील श्रीराम महाराज संस्थान व समर्थ कुटी आश्रमाचे संस्थापक सद्‌गुरू श्रीराम महाराज इनामदार (वय 63) यांचा काल (ता. 18) झालेल्या अपघातात मृत्यू झाला. अन्य दोन पुरुष व महिला साधक गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

येथून पाच किलोमीटर अंतरावर मायणी-दहिवडी रस्त्यावरील धोंडेवाडीच्या (ता. खटाव) हद्दीत काल साडेसहा ते सातच्या दरम्यान जीपला (एमएच 13 सीयु 1313) अपघात झाला. त्याबाबत पोलिस व महाराजांचे अनुयायी, साधकांकडून मिळालेली माहिती : विटा (जि. सांगली) येथील अनुयायांना अनुग्रह देऊन महाराज मायणीमार्गे वावरहिरे (ता. माण) येथे निघाले होते. तेथे धर्मनाथ बीजेनिमित्त साडेतीन कोटी राम नाम जपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तिकडे जाताना महाराज चालवत असलेल्या जीपचा ताबा सुटला. त्यामुळे गाडी कोलांटउड्या मारत नाल्यात जाऊन पडली. त्यामध्ये महाराज, उस्मानाबादेतील साधक अजित पाठक अन्य पुरुष व महिला साधक गंभीर जखमी झाले. अपघाताच्या मोठ्या आवाजाने परिसरातील वस्तीवरील लोक धावतच घटनास्थळी आले. स्थानिक कार्यकर्त्यांनी जखमींना तातडीने उपचारासाठी सातारा येथे नेले. तेथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना श्रीराम महाराजांचा मृत्यू झाला. त्यांनी नर्मदा काठासह ठिकठिकाणी प्रभू श्रीराम, गोंदवलेकर महाराज, हनुमान आदींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेशमध्ये त्यांचे हजारो साधक व अनुयायी आहेत. श्रीराम महाराजांचे वडील श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी स्थापन केलेल्या गोंदवले बुद्रुक येथील श्री दत्त मंदिरात पुजारी होते.

श्रीराम महाराजांचे सातवीपर्यंतचे शिक्षण हिंगणे (ता. खटाव) येथे झाले. त्यानंतर अकरावीपर्यंतचे शिक्षण कोल्हापुरातील लेखिका डॉ. सुमती क्षेत्रमाडे व मुंबईला श्रीपाद कविश्वर यांच्याकडे राहून झाले. त्यानंतर त्यांनी कर्नाटकातील धारवाड व पुणे येथील वेदपाठशाळेत राहून जप साधना करीत वैदिक शिक्षण घेतले. 1983 मध्ये नर्मदा तिरी गेल्यानंतर त्यांनी समर्थ कुटी या आश्रमाची स्थापना केली. नाशिक, गाणगापूर, तसेच इंदोरमध्ये त्यांनी तपश्‍चर्या केल्यानंतर त्यांनी बडगाव येथे समर्थ कुटी मठ उभारला. या मठात श्री ब्रह्मचैतन्य महाराज व श्रीरामाची आराधना केली जाते. सुमारे 35 वर्षे ते या मठाचे मठाधिपती होते. या दरम्यान त्यांनी नर्मदेच्या तीन परिक्रमादेखील पूर्ण केल्या होत्या.

Web Title: mayani satara news shriram maharaj death in accident