शाळेतील विद्यार्थ्यांना दूधवाटप

सोनगाव संमत निंब (ता. सातारा) - प्राथमिक शाळेतील मुलांना बुधवारी दूधवाटप करताना कमलाकर शिंदे व ग्रामस्थ.
सोनगाव संमत निंब (ता. सातारा) - प्राथमिक शाळेतील मुलांना बुधवारी दूधवाटप करताना कमलाकर शिंदे व ग्रामस्थ.

सातारा - राज्यात दूध दरवाढीच्या आंदोलनाने उग्ररूप धारण केले असून, जागोजाग रस्त्यावर दूध ओतून देणे, दुधाच्या टॅंकरचे नुकसान करणे असे प्रकार सुरू असताना सोनगाव संमत निंब (ता. सातारा) येथील दूध उत्पादकांनी आज प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दूध वाटून आंदोलनात सहभाग नोंदवला. वडगाव (जयराम स्वामी, ता. खटाव) येथील उत्पादकांनीही गरजूंना मोफत दूध वाटून आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला. या दोन्ही गावच्या उत्पादकांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. 

दिवसेंदिवस गायी, म्हशींच्या वाढत असलेल्या किमती, त्यांचे पालनपोषण करण्यासाठी येणारा खर्च वाढत आहे. मात्र, वैरण, खाद्य, औषधांचे गगनाला भिडत असलेले दर पाहता उत्पादकांना दुधाला मिळत असलेला भाव तुटपुंजा आहे. जनावरे पाळणे हे शेतकऱ्यांच्या आवाक्‍याबाहेर होऊ लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह दूध उत्पादकांनी दूध दरवाढीसाठी आंदोलन सुरू केले असून, या आंदोलनाने आज चौथ्या दिवसअखेर उग्ररूप धारण केले आहे. जागोजागी रस्त्यावर दूध ओतून देणे, दुधाच्या टॅंकरचे नुकसान करणे असे सर्रास प्रकार सुरू असल्याने पोलिसांनी दूध उत्पादकांसह कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. या पार्श्‍वभूमीवर सोनगाव संमत निंब येथील दूध उत्पादकांनी दूध संकलित करून रस्त्यावर ओतून न देता ते गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वाटून आंदोलनात भाग नोंदवला. आपले उत्पादित दूध हे जर गावच्या मुलांच्या पोटात गेले तर ती अधिक सुदृढ होतील, अशी भावना या उत्पादकांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.   

वडगावात गरजूंना दूध वाटप
वडगाव (जयराम स्वामी) येथील हुतात्मा दूध संकलन केंद्राचे संचालक रंगुनाथ घार्गे आणि मोहन घार्गे यांनी गावातीलच गरजू लोकांना मोफत दूध वाटून दूध दर आंदोलनास पाठिंबा दिला आहे.

दूध दरवाढ झालीच पाहिजे. या आंदोलनास आमचा पाठिंबा आहे. आम्ही आमची जनावरे स्वतःच्या मुलाबाळाप्रमाणे सांभाळतो. त्यांचे दूध रस्त्यावर ओतणे हे मनाला पटत नव्हते. म्हणून आम्ही हे दूध मुलांच्या पोटात जाईल या हेतूने शाळेत वाटप केले. आंदोलकांनी असेच उपक्रम राबवावेत.
- कमलाकर शिंदे, दूध उत्पादक, सोनगाव संमत निंब    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com