#MilkAgitation सांगली जिल्ह्यात 12 लाख लिटर दूधाचे संकलन ठप्प 

#MilkAgitation सांगली जिल्ह्यात 12 लाख लिटर दूधाचे संकलन ठप्प 

सांगली -  दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला पाठींबा देत जिल्ह्यातील दूध संकलन आज (सोमवारी) शंभर टक्के बंद ठेवण्यात आले. त्यामुळे सुमारे बारा लाख लिटर दुधाचे संकलन ठप्प झाले. हे दूध वाया न घालवता जागोजागी वाटप कार्यक्रम घेण्यात आले. विशेषतः शाळांमध्ये पोषण आहारासोबत मुलांनी दूग्धपाणाचा आनंद घेतला. सरींवर सरी कोसळत असताना अनेक शाळांमध्ये गरमागरम दूध वाटण्यात आले. अनेक हॉटेलमध्ये साधा चहा बंद ठेवून त्यात दरात स्पेशल चहा देण्यात आला. शेतकऱ्यांच्या घरात चुली मांडून बासूंदीचा घाट घातला गेला. रोज एक माप दूधाचे घरगुती रतीब नेणाऱ्यांना आज "बोनस' म्हणून आणखी एक माप दूध मिळाले. 

शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेहमीच केंद्रस्थान राहिलेल्या सांगलीत शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध बंद आंदोलनाला पाठींबा जाहीर केला आहे. विशेषतः गायीच्या दुधाच्या दरात होत असलेल्या अन्यायाविरुद्ध शेतकऱ्यांनी नुकसानीची फिकीर न करता त्याला साथ देण्याची भूमिका घेतली आहे. परिणामी पन्नास-पन्नास लिटरचे कॅन भरून दूध उत्पादन करणाऱ्यांनी कॅन आहे तसे शाळेच्या पोषण आहार खोल्यामध्ये रिकामे केले. अनेकांना हॉटेल चालकांना फ्रीमध्ये दूध दिले. दूध संघांच्या गाड्या निघाल्या तर त्या रस्त्यावर ओतून टाकू, मात्र घरचे दूध सर्वसामान्यांच्या पोटात जाऊ द्या, असे आवाहन करत गावोगोवची शेतकरी तरुणाई याकामी राबताना दिसत होती. 

या आंदोलनाला जिल्ह्यातील राजारामबापू, हुतात्मा, वारणा, सोनहिरा, मोहनराव शिंदे, डोंगराई अशा सर्वच दूध संघांनी पाठींबा देत दूध संकलन बंद ठेवले. सकाळच्या टप्प्यात डेअरी उघड्या नव्हत्या. चिलिंग प्लॅंटच्या वाहनांना रोखून दूध रस्त्यावर ओतले जात असल्याने त्यांना संकलन शंभर टक्के बंद ठेवले. त्यामुळे जिल्ह्यात आंदोलन शांततेच्या व सहकार्याच्या मार्गाने सुरु झाले. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, महेश खराडे, किसान सभेचे कॉ. उमेश देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांनी जागोजागी पाहणी करून लोकांना सूचना दिल्या. जिल्हा पोलिसांनी धरपकड सुरु केल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com