वैद्यकीय सेवेतील लोकसहभाग महत्त्वाचा : डॉ. सापळे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

मिरज वैद्यकीय महाविद्यालयात राज्यव्यापी परिषदेस प्रारंभ

मिरज वैद्यकीय महाविद्यालयात राज्यव्यापी परिषदेस प्रारंभ

मिरज: शासकीय किंवा सार्वजनिक वैद्यकीय सेवेत यापुढे लोकसहभाग महत्त्वाचा समजला पाहिजे, त्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. अपघात, आकस्मिक दुर्घटना किंवा तातडीच्या वेळी सर्वसामान्य लोकांना प्राथमिक उपचार समजले पाहिजेत, यासाठी लोकांना प्रशिक्षण देऊन त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी मिरज वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र विभाग सुरू झाल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली. आजपासून महाविद्यालयात चार दिवसांच्या वैद्यकीय परिषदेस सुरवात झाली. यामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यांतील डॉक्‍टरांपासून ते वैद्यकीय महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

तातडीची वैद्यकीय सेवा या विषयासह अन्य अनेक वैद्यकीय संशोधनांबाबत या परिषदेत चर्चा कार्यशाळा होणार आहेत. यामध्ये प्रमुख विषय आकस्मिक दुर्घटनांवेळी वैद्यकीय मदतीचा आहे. डॉ. सापळे म्हणाल्या, ""दुर्घटनेनंतर कोणाही सर्वसामान्य लोकांची भावना जखमीचा प्राण वाचवण्याचीच असते; पण त्यासाठीचे थोडेफार तरी वैद्यकीय ज्ञान असणे गरजेचे असते. अनेक रुग्णांना केवळ तातडीचे प्राथमिक उपचार मिळत नसल्याने प्राण गमवावा लागतो. सामान्य लोकांच्या अशा प्रयत्नांमुळे प्राण वाचू शकतात. हेच ज्ञान लोकांना देणारे मिरज वैद्यकीय महाविद्यालय हे एकमेव विद्यालय असल्याचा दावा डॉ. सापळे यांनी केला. यासाठी महाविद्यालयात स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला आहे. डॉ. भावेश शहा हे त्याचे प्रमुख आहेत. हा विभाग कोणत्याही वयोगटातील स्त्री-पुरुषांना हे प्रशिक्षण देईल. आजच्या परिषदेमध्ये वैद्यकीय शाखेच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना फाटलेल्या जखमांवर टाके घालण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले.''